Rajinikanth Viral Photos: रजनीकांत यांनी १९७५ साली ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या तमीळ चित्रपटाचे दिग्दर्शक के. बालाचंदर हे होते. या चित्रपटात त्यांची भूमिका छोटी होती; पण त्या भूमिकेतून त्यांनी चाहत्यांची मने जिंकली.

या चित्रपटानंतर त्यांनी नायकाची भूमिका साकारत, अनेक चित्रपटांत काम केले. त्यांनी फक्त दाक्षिणात्य चित्रपटांतच काम केले असे नाही, तर त्यांनी बॉलीवूडमध्येदेखील त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. आज संपूर्ण जगभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. अनेक नवीन कलाकारांसाठी ते प्रेरणास्थानी आहेत.

रजनीकांत यांचा साधेपणा पाहून भारावून गेले चाहते

वयाच्या ७४ व्या वर्षीही ते दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. २०२५ मध्ये त्यांचा कुली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता रजनीकांत त्यांच्या कामामुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. या दिग्गज अभिनेत्याने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियावर रजनीकांत यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

रजनीकांत सध्या हृषिकेशला गेले आहेत. तेथील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये धोतर आणि पांढरा शर्ट या वेशातील रजनीकांत पत्रावळीवर जेवत असल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे रजनीकांत जेवत आहेत. त्यांचा हा साधेपणा पाहून चाहते भारावून गेले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

रजनीकांत यांनी गंगा आरतीसुद्धा केली. त्याबरोबरच त्यांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये ते काही लोकांबरोबर गप्पा मारत असल्याचे दिसत आहे; तर काही रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी हृषिकेशमधील स्वामी दयानंद आश्रमाला भेट दिली आणि स्वामी दयानंद यांना श्रद्धांजली वाहिली. काही वर्षांपासून रजनीकांत नियमितपणे या आश्रमाला भेट देत आहेत. त्याबरोबरच ते पुढील काही दिवस हिमालयात राहणार आहेत.

रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्यांचा कुली हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत; परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच ते जेलर २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘जेलर २’मध्ये रजनीकांत यांच्याबरोबर मोहनलाल, शिवा राजकुमार व जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. रजनीकांत यांना तमीळ चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आता चाहते त्यांच्या ‘जेलर २’ची वाट पाहत आहेत.