Superstar Rajanikanth दक्षिणेत सिनेमाचे नायक आणि त्यांना भरभरून मिळणारे चाहत्यांचे प्रेम, तिथल्या जनमानसात असणारी सिनेमाबद्दलची ओढ याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्यांचे सिनेमे आले की त्यांच्या मोठ्या पोस्टर्सना दुग्धाभिषेक करून त्याची पूजा करताना अनेक चाहत्यांना आपण पाहिलं आहे. आपल्या लाडक्या स्टारचा एक सिनेमा आला तर एवढं प्रेम देणारे चाहते, एकाच सिनेमात अनेक स्टार्स असतील तर काय करतील? त्यातही हे स्टार्स नागार्जुन आणि थलाईवा रजनीकांत असतील तर! हो, दक्षिणेचे हे दोन मोठे स्टार्स एकाच सिनेमात दिसणार आहेत. त्यात बाहुबलीमध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराजही असणार आहेत.

‘मास्तर,’ ‘लिओ,’ ‘कैथी,’ आणि ‘विक्रम’ या प्रसिद्ध सिनेमांचे दिग्दर्शक लोकेश कन्नगराज ‘कुली’ हा सिनेमा तयार करत आहे. यात थलाईवा रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर नागार्जुन आणि अभिनेत्री श्रृती हसन सुद्धा या सिनेमात दिसणार आहेत. काल लोकेश कन्नगराजने त्याच्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) सोशल मीडिया अकाऊंटवरून रजनीकांत यांच्या भूमिकेचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे.

हेही वाचा…शाहरुखनंतर अ‍ॅटलीच्या नव्या सिनेमात झळकणार सलमान खान आणि कमल हसन, ‘या’ महिन्यापासून चित्रीकरणाला होणार सुरुवात

हे पोस्टर शेअर करताना लोकेश लिहितो की, सुपरस्टार रजनीकांत सर ‘कुली’ सिनेमात देवा या भूमिकेत दिसणार आहेत. सर, यासाठी धन्यवाद; हा धमाकेदार अनुभव असणार आहे. या पोस्टरमध्ये ७३ वर्षीय रजनीकांत हे रावडी लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या हातात सोनेरी बिल्ला (नंबर प्लेट) असून ते खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या बिल्ल्यावर ‘१४२१’ क्रमांकाची काळी प्रिंट आहे. लोकेश गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाच्या प्रत्येक स्टार्सचे पोस्टर्स शेअर करत आहे.

कलाकारांची मांदियाळी आणि पोस्टर्सची उत्कंठा

गेल्या आठवड्यात लोकेशने सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं. त्यानंतर त्याने मल्याळी सिनेसृष्टीतील अभिनेते शोभिन शाहीर हे या सिनेमात भूमिका करत असल्याचं जाहीर करत त्यांचं पोस्टर शेअर केलं. अभिनेते नागार्जुन यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ते सुद्धा या सिनेमात काम करणार असल्याचं, आणि ते सिमोन या भूमिकेत दिसणार असल्याचं लोकेशने पोस्टर शेअर करत जाहीर केलं. लोकेशने गेल्या आठवड्यापासून कालपर्यंत काही दिवसांच्या अंतराने कोण कोण कलाकार या सिनेमात दिसणार आहेत हे पोस्टर्स शेअर करत चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. श्रुती हसन ही प्रीती, तर बाहुबली फेम सत्यराज राजशेखर या भूमिकेत दिसणार आहेत, असं त्याने एक्स अकाऊंटवरून जाहीर केलं. सर्वात शेवटी लोकेशने सुपरस्टार रजनीकांत यांचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सर्व कलाकारांच्या हातात काही वस्तू किंवा हत्यार आहे. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या कलाकारांच्या हाती असणाऱ्या हत्यार किंवा वस्तूचा रंग सोनेरी असून सर्व पोस्टर्समध्ये हे साम्य का आहे याचा चाहते अंदाज बांधत आहेत.

हेही वाचा…“… अन् मी दोन महिने रोज रडत होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “मला अचानक…”

दक्षिणेच्या सर्व सिनेसृष्टीचे तारे एकाच सिनेमात

रजनीकांत आणि सत्यराज हे तामिळ सिनेमाचे (कॉलीवूड) स्टार असून ‘कुली’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर तेलगु (टॉलीवूड) सिनेमाचा स्टार नागार्जुन, कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेता उपेंद्र, मल्याळी (मॉलीवूड) सिनेसृष्टीतील अभिनेते शोभिन शाहीर यांच्या भूमिकांमुळे संपूर्ण दक्षिणेतील सिनेसृष्टीतील तारे या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार असून प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच असणार आहे.

हेही वाचा…जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”

‘कुली’ सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असून या सिनेमाला ‘कोलावरी डी’ फेम अनिरुद्ध संगीत देणार आहे. अनिरुद्धने याआधी ‘जवान’ सिनेमाला संगीत दिलं आहे. दरम्यान, ‘कुली’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत असलेले सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘वेतायान’ सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.