कन्नड अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) मंगळवारी (४ मार्च) बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. सोनेतस्करीच्या कथित प्रकरणात तिला ही अटक करण्यात आली. दुबईहून परतत असताना महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. अटकेच्या कारवाईनंतर तिची चौकशी सुरू होती. त्यानंतर गुप्तचर महसूल संचालनालयाला (डीआरआय) दिलेल्या जबाबात अभिनेत्रीनं आपला गुन्हा कबुल केला आहे. रान्यानं कबुल केलं की, तिच्याकडून सोन्याच्या १७ सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रान्या रावकडून गुन्हा कबूल

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, डीआरआयला दिलेल्या पहिल्या जबाबात रान्यानं (Ranya Rao) असं सांगितलं की, तिनं केवळ दुबईच नव्हे, तर युरोप, अमेरिका, सौदी अरेबियामध्येही प्रवास केला आहे. पुढे अभिनेत्रीने अधिक माहिती देण्यास नकार दिला आणि अधिकाऱ्यांकडे विश्रांतीसाठी परवानगी मागितली. अटकेनंतर पोलिसांनी तिच्या घरावरही छापा टाकला. त्यात पोलिसांनी २.६७ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तसेच तीन मोठे बॉक्सदेखील जप्त केले. या जप्तीची एकूण किंमत १७.२९ कोटी रुपये आहे.

रान्या रावचा जामिनासाठी अर्ज

रान्याचा (Ranya Rao) दुबईला वारंवार प्रवास होत होता. त्यामुळे ती अधिकाऱ्यांच्या रडारवर होती. गेल्या वर्षी तिने ३० वेळा आणि १५ दिवसांत अनेक शहरात प्रवास केल्याचं वृत्त आहे आणि प्रत्येक वेळी ती सोने आणत असे. अटकेनंतर रान्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. अभिनेत्रीने जामिनासाठी अर्जही दाखल केला होता; परंतु आर्थिक गुन्हे न्यायालयाने तिच्या जामिनावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता.

रान्या रावचा पती जतीन हुक्केरीचीही चौकशी

रान्याच्या (Ranya Rao) सोने तस्करीप्रकरणी पोलिस तिचा पती जतीन हुक्केरीचीही चौकशी करीत आहेत. पोलिसांनी आरोप केला आहे की, जतीन अनेकदा अभिनेत्रीबरोबर दुबईला जात असे. चार महिन्यांपूर्वी ताज वेस्ट एंड येथे त्यानं रान्याशी लग्न केलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी अभिनेत्री, तसेच तिच्या पतीकडून आता आणखी कोणती माहिती समोर येणार? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranya rao confessed in smuggling case she got 17 gold bars ssm 00