कन्नड आणि तमिळ चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) मंगळवार (०४ मार्च) रोजी बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली. अभिनेत्री बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती, तेव्हा तिच्याकडे सोनं होतं, यामुळे तिला अटक करण्यात आली. ती दुबईहून परतत असताना महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. यावेळी तिच्याकडे तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही जप्ती अलीकडील सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक असल्याचा दावा महसूल गुप्तचर विभागाने केला आहे. या कारवाईनंतर तिला अटक करण्यात आली असून अटकेनंतर तिने एक धक्कादायक दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनं तस्करीसाठी धमकी देण्यात आल्याचा खुलासा

रान्या रावने (Ranya Rao) तिला सोन्याची तस्करी करण्यासाठी धमकी देण्यात आली होती असं पोलिसांना सांगितलं आहे. यादरम्यान, सुरक्षा भंग करण्यात तिला कथितरित्या मदत करणाऱ्या कॉन्स्टेबल बसवराजू यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरावरही छापा टाकला. यात पोलिसांनी २.६७ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. तसंच पोलिसांनी रान्या रावच्या घरातून तीन मोठे बॉक्सदेखील जप्त केले. या जप्तीची एकूण किंमत १७.२९ कोटी रुपये आहे.

बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच रान्याने पोलिस कॉन्स्टेबल बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणीला बायपास करण्याचा प्रयत्न केला. पण डीआरआय (रेव्हेन्यू इंटेलिजेंस डायरेक्टरेट) रान्या रावच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे अभिनेत्री बायपास करण्याचा प्रयत्न करत असताना, डीआरआयने तिला रंगेहाथ पकडले. यानंतर अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीच्या जॅकेटमधून १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने जप्त केले. गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली आणि त्यामुळे ती डीआरआयच्या रडारवर होती.

कोण आहे अभिनेत्री रान्या राव?

दरम्यान, रान्या रावने (Ranya Rao) कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या रावला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच तिची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी नेमकी कोणती माहिती समोर येणार? यात तिच्या सह आणखी कोण आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranya rao revealed that she was blackmailed after arrested in gold smuggling case ssm 00