सिनेमासाठी आपला लूक बदलणे हे कोणत्याही कलाकारासाठी नवीन राहिलेले नाही. अनेकदा कलाकारांना भूमिकेची गरज म्हणून अजब लूकमध्ये समोर यावे लागते. कलाकारांच्या याच यादीत आता सैफ अली खानचे नाव जोडले गेले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सैफ अली खानचा ‘कालाकांडी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘कालाकांडी’ सिनेमात सैफ एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या लूकमध्ये सैफने केसांना अनेक रबर बँड लावलेले दिसत होते. आपल्या या सिनेमाबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, ‘या सिनेमाचा एक भाग होऊ शकलो याचा मला आनंद आहे.’ सिनेमाच्या दिग्दर्शकाबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, ‘अक्षय वर्मा एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. मुंबई हे फार सुंदर शहर आहे. अक्षयने सिनेमात हे शहर तितकेच सुंदर दाखवले आहे.’ सहा व्यक्तिंच्या आयुष्याभोवती फिरणारा हा एक थ्रिलिंग डार्क कॉमेडी सिनेमा आहे.

सैफने एका पोस्टरमध्ये पांढऱ्या रंगाच्या शर्टवर पिवळ्या रंगाचा श्रग घातला आहे. सैफला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे आयुष्य कशाप्रकारे बदलते हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. सोमवारी या सिनेमाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये मुंबईची झलक तर दाखवलीच होती. याशिवाय गडद रंगात सैफची छबीही पोस्टरमध्ये दाखवण्यात आली होती.

अक्षत वर्मा दिग्दर्शित या सिनेमात सैफ अली खानसोबत अक्षय ओबेरॉय, दीपक डोबरि‍याल, कुणाल रॉय कपूर आणि अमायरा दस्तूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सैफचे या वर्षातले ‘रंगून’ आणि ‘शेफ’ हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर पुढच्या वर्षी प्रदर्शित होणारा ‘कालाकांडी’ हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करु शकेल की नाही हे पाहावे लागेल. ‘कालाकांडी’ सिनेमानंतर पुढच्या वर्षी सैफचा ‘बाजार’ सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.