Saleel Kulkarni Shared Old Photos On Guru Purnima : आपल्याकडे गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिलं जातं. गुरुंचं आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्यासाठी काही गोष्टी सोप्या होतात. पण, गुरु ही व्यक्ती प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. आई-वडील, शिक्षक, मोठी भावंडं, मित्र-मैत्रिणी यापैकी कोणीही गुरुच्या ठिकाणी असू शकतं. अशातच आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनीसुद्धा त्यांच्या आई-वडिलांसाठी खास पोस्ट केली आहे. यामधून त्यांचे आई-वडीलच त्यांचे गुरु असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे.
सलील कुलकर्णी सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. नेहमी ते त्यांच्या कामासंदर्भातील अपडेट यामार्फत शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यासह ते सामाजिक विषयावरील त्यांचं मतदेखील सोशल मीडियावरून व्यक्त करत असतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी त्यांच्या आई-वडिलांबरोबरचे काही जुने फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सलील कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या फोटोंना खास कॅप्शन देत म्हटलं आहे, “जी व्यक्ती चालायला शिकवते. धावायला बळ देते आणि उगाच धावण्यातला फोलपणा सजवून सांगते… ते गुरु. काहीही लिहिताना, गाताना, बोलताना, चित्रपट करताना ज्यांचा धाक वाटतो, यांना आवडायलाच हवं, यांना पटायला हवं असं वाटतं ते गुरु. काय अनुभवायला हवं आणि कुठे फिरकायचंसुद्धा नाही हे स्वतःच्या अनुभवातून सांगतात ते गुरु.”
सलील कुलकर्णी पुढे म्हणातात, “मी सांगतो तेच करायला हवं असं न म्हणता तू करून पाहा, मी आहेच पाठीशी असं म्हणतात ते गुरु. चांगल्या गोष्टीची गोडी लावतो तो गुरु. १००% कशाला म्हणायचं हे शिकवतो तो गुरु. मीपणा बाजूला ठेवून काहीही अपेक्षा न ठेवता देऊ शकतो तो गुरु. म्हणजेच जो आई होऊ शकतो तो गुरु, जो बाप होऊ शकतो तो गुरु.”
सलील कुलकर्णी त्यांच्या आईबरोबरचे फोटो व व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियामार्फत पोस्ट करत असतात. जेव्हा त्यांना त्यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हादेखील त्यांनी त्यांच्या आईसह पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला कोठारे, अभिनेते सुमित राघवन हे कलाकार झळकले होते.
सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. यासह ते चित्रपट दिग्दर्शकदेखील आहेत. ‘एकदा काय झालं’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. तर ते मराठीतील प्रसिद्द गायक, संगीतकार यांच्यापैकी एक मानले जातात. त्यांच्या व संदीप खरे यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते.