Shaky Song Sanju Rathod, Isha Malviya : संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं २२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. संजूच्या या शेकी गाण्याने महिन्याभरातच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. इन्स्टाग्राम रील्सपासून ते युट्यूबच्या शॉर्ट व्हिडीओपर्यंत या गाण्याला सर्वत्र नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या गाण्यात संजूसह ‘बिग बॉस’ गाजवणारी अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे.
संजू राठोड ‘शेकी’ गाण्याविषयी ‘टेली फिल्म्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मला असं वाटतं आपण ठरवलेल्या त्याच गोष्टी यशस्वी होतात ज्या आपण प्लॅन करत नाही. मला यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं… त्यामुळे हे गाणं मी Afro स्टाइलने बनवलं. त्यानंतर माझा भाऊ G-Spark ने या गाण्याला थोडा राजस्थानी टच दिला. बाकी या गाण्याच्या व्हिडीओचं क्रेडिट इनसाइड मोशन पिक्चर्सच्या टीमचं आहे. त्यांनीही खूप मेहनत घेतली होती.”
“शेकी गाणं कसं सुचलं?” याविषयी संजू म्हणाला, “माझ्या प्रत्येक गाण्याचे बोल, गाण्याच्या ओळी जास्तीत जास्त बेसिक आणि सर्वांना समजतील अशाच असतात. हे गाणं लिहिताना सुद्धा मनात तोच विचार होता. ‘शेकी’ हे एकदम फन कॅटेगरीमधील गाणं आहे. त्यामुळे आपण बोलताना किती सहज बोलू शकतो…या सगळ्याचा विचार करून मी हे गाणं मी लिहिलं होतं. Afro, मराठी, राजस्थानी असं फ्युजन गाणं मला बनवायचं होतं आणि यामुळेच ‘शेकी’ गाणं मी लिहिलं”
“या सगळ्यात ईशाचं सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल, ती प्रचंड हुशार आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान, ईशाने जो लेहेंगा घातला होता, त्याचं वजन जवळपास ४० ते ४५ किलो होतं. ज्यावेळी ईशा लेहेंगा घालून आली, तेव्हा म्हणाली मी इतका जड लेहेंगा घालून यात डान्स वगैरे करू शकत नाही…आणि हे ऐकून माझं असं झालं… अरे हिलाच खरी हूकस्टेप करायची आहे आणि आता काय करायचं? आधीच आम्हाला वेळ झाला होता पण, शेवटी ईशाने खूप चांगलं शूट केलं.”
ईशा मालवीय या गाण्याविषयी म्हणाली, “मी खूप आनंदी आहे कारण, या गाण्याच्या निमित्ताने मला पहिल्यांदाच मराठीत काम करण्याची संधी मिळाली. मी नक्कीच आता या इंडस्ट्रीत पुढे काम करण्यास उत्सुक असेन. ‘शेकी’ गाण्याचं शूट करताना सगळ्या गोष्टी ऑन पॉइंट होत्या. गायक, दिग्दर्शक, प्रोडक्शन टीम सगळेजण खूप मेहनतीने काम करत होते. लेहेंग्याबद्दल सांगायचं झालं, तर त्याचं वजन खरंच खूप जास्त होतं. मला डान्स करणं केवळ अशक्य वाटत होतं. पण, मी टीमला सांगितलं तुम्ही गाणं लावा मी करेन…आणि अशा पद्धतीने आम्ही ते शूटिंग पूर्ण केलं.”
याशिवाय ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संजू म्हणाला, “शूट सुरू होईपर्यंत आम्ही या गाण्याचं नाव देखील ठरवलं नव्हतं. पोस्टर जेव्हा बनवायला दिलं तेव्हा सगळे विचारात पडले होते, आता या गाण्याचं नाव काय ठेवायचं? ‘इनसाइड मोशन्स’च्या टीमने या गाण्याचं फुटेज सगळं ‘शेकी’ या नावाने सेव्ह केलं होतं. मग आम्ही ठरवलं की या गाण्याचं नाव ‘शेकी’ ठेवायचं. मराठी लोकांसाठी हे नाव काहीसं नवीन होतं. अनेकांनी पोस्टवर ‘शेकी’ वाचून ‘शक्य, शकी’ असंही म्हटलं पण, आता हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.”