|| नीलेश अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ‘रेडिओ नशा’वर एक नवा आरजे श्रोत्यांच्या मनात घर करून बसला आहे. हा आरजे अनुभवी नट आहे, दिग्दर्शक आहे आणि निर्माताही आहे. आणि सध्या त्यांच्या निर्मितीची दखल सर्वच स्तरांवरून घेतली जाते आहे. एके काळी रुपेरी पडद्यावर ‘कॅलेंडर’ या त्यांच्या व्यक्तिरेखेच्या नावाने लोकप्रिय झालेले हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे सतीश कौशिक. ऑक्टोबर महिन्यात येऊ  घातलेल्या ‘मन उधाण वारा’ या मराठी चित्रपटाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा उल्लेख करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटाचे निर्माता म्हणून सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. ‘लालबाग परळ’सारख्या संवेदनशील चित्रपटातून मराठी सिनेमात पदार्पण करत सतीश कौशिक यांनी छोटय़ाशा भूमिकेतूनही मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले. परंतु आता ते निर्मात्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नाटकाच्या जिवंत पडद्यावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज मराठी चित्रपट निर्मात्यापर्यंत येऊ न पोहोचला आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत..

सतीश कौशिक यांनी आजवर आपल्या विनोदी भूमिकेतून तमाम भारतवासीयांच्या मनात घर केले. कधी ते पप्पू पेजर झाले, कधी कॅलेंडर, कधी जर्मन तर कधी कुंजबिहारी म्हणून त्यांनी प्रेक्षकांना हसवले. त्यांच्या या अभिनयाच्या प्रवासाविषयी ते म्हणतात, एनएसडीमधून शिक्षण पूर्ण केल्यांनतर काय करावे, असा मोठा प्रश्न होता. माझ्यावर नाटकाचे संस्कार झाल्याने काही तरी वेगळे करण्याची तीव्र इच्छा होती. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मला मुंबईची वाट धरावी लागली. विशेष म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी आम्हाला मुंबईला जाणे म्हणजे ‘परदेशवारी’हून कमी नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ आठशे रुपये घेऊ न मी मुंबईत प्रवेश केला. जे मिळेल ते काम करायचे, असा निश्चय केला होता. त्यामुळे काम मिळत गेले आणि मी करत गेलो, असे ते म्हणतात. मुंबईत आलो तेव्हा राहायला जागा नव्हती, पण आठव्याच दिवशी पृथ्वी थिएटरला नाटकात अभिनेता म्हणून संधी मिळाली. पुढे उपजीविकेसाठी प्रसंगी नोकरीही केली, असे ते सांगतात. मुंबई अनुभवतच अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, वणवण फिरलो, कामासाठी धडपड करत राहिलो. हा खडतर प्रवास आजही मला स्पष्ट आठवतो, म्हणून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक नवीन मुलाला मी आदराने भेटतो, त्याच्याशी बोलतो आणि आदरपूर्वक वागणूक देतो, असे त्यांनी सांगितले.

छोटे-मोठे काम एकीकडे सुरूच असताना, यशाचा चढता आलेख हा ‘मासूम’ चित्रपटापासून सुरू झाला, असे त्यांनी सांगितले. शेखर कपूर यांच्या तालमीत मला साहाय्यक दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि माझ्यासाठी चित्रपटाचे विद्यापीठ खुले झाले. तिथेच मला शबाना, नासिर, जावेद अशी दिग्गज मंडळी भेटली. मी कधीच कामाशी अप्रामाणिकपणे वागलो नाही. त्यामुळे माझ्या कामाची खूप वाहवा व्हायची. आणि म्हणूनच साहाय्यक दिग्दर्शकापासून माझी बढती दिग्दर्शक पदावर झाली आणि ‘रूप की रानी चोरों का राजा’ हा माझा पहिला चित्रपट १९९३ला प्रदर्शित झाला. सिनेमा म्हणजे काय.. तर प्रेक्षक तुमच्या जवळ आला आहे. क्लोजप, मिड, वाइड अशा तांत्रिक कृतीतून प्रेक्षकांना हा सिनेमातील प्रसंग जणू आपल्या बाजूलाच घडतो आहे, याची जाणीव करून देणे म्हणजे चित्रपट होय. हे मी याच तालमीत शिकलो असे ते आवर्जून सांगतात.

त्यांच्या आजवरच्या यशाचे श्रेय मात्र ते नाटकांच्या संस्कारांना देतात. नाटकाविषयी ते म्हणतात, आज वयाच्या ६३ व्या वर्षी आणि चाळीस वर्षे सिनेसृष्टीत काम करूनही आजही मला नाटकच जवळचे वाटते. मी आजही नाटक करतो. कारण तो जिवंत आविष्कार प्रेक्षकांसमोर सादर करायची मजाच वेगळी आहे. दिग्दर्शक म्हणून जर सांगायचे झाले तर, चित्रपट तुम्हाला हवा तसा पाहता येतो. हवा तसा दाखवता येतो, पण नाटकाच्या बाबतीत ते होत नाही. एक संबंध कथाविश्व तुमच्या डोळ्यांपुढे दिसत असते. अभिनेत्याचाही कस लागतो. कारण कॅमेरा जवळ नेऊन हावभाव टिपण्याचे तंत्र तिथे नसल्याने दुरूनही प्रेक्षकांना तो प्रसंग तितकाच जिवंत वाटायला हवा. आनंद देसाई, कविता चौधरी, गोविंद नामदेव, सुहास खांडके असे आम्ही एकत्र नाटकाचे धडे गिरवले आहेत. मी, अनुपम खेर, नसिरुद्दीन आम्ही आजही नाटकांसाठी वेडे आहोत. आणि मराठीत ज्या पद्धतीचे विषय येत आहेत त्याचे मला विशेष कौतुक वाटते, असे ते सांगतात.

‘मन उधाण वारा’ चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना संपूर्ण मराठी रसिकांचे आणि महाराष्ट्राचे आपण ऋणी असल्याचे ते सांगतात. ‘चाळीस वर्षे इथल्या मातीच्या आपलेपणावर मी जगलो आहे. मला महाराष्ट्रात कधीही परकेपणा वाटला नाही. माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मला मिळालेले नाव आणि पैसा यात त्यांचाही वाटा आहे. आणि माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मी काही तरी करतोय याचा मला आनंद आहे’, असे ते सांगतात.

विनोदी भूमिकांविषयी बोलताना, रसशास्त्रात सांगितलेला हास्यरस हा विनोदाने निर्माण होतो. कोणतेही पात्र विनोदी नसते. ते तशा पद्धतीने साकारायचे कौशल्य अवगत व्हायला हवे. लोकांना काय आवडते, लोकांना कसे विनोद कळतात याचा अंदाज असायला हवा. आणि विनोदी पात्रापुढे कायम आव्हान असते. कारण पात्र जरी विनोदी असले तरी प्रत्येक चित्रपटात त्याचे वेगळे महत्त्व आणि वेगळा चेहरा लोकांसमोर आणता यायला हवा, असे ते म्हणतात. पप्पू पेजर, कॅलेंडर, मुत्तुस्वामी, जम्बो, जर्मन या भूमिका विनोदी असल्या तरी प्रत्येकाचे वेगळेपण आजही प्रेक्षकांना ठाऊक आहे, पण मी विनोदी भूमिका करतो म्हणजे मला बाकी काही येत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. मला गंभीर भूमिकाही तितक्याच प्रिय आहेत. ‘लालबाग परळ’मध्ये मूल नसलेल्या मामाची व्यथा मी केवळ हावभावातून मांडली आहे. ‘सुरमा’, ‘भारत’, ‘उडता पंजाब’ प्रत्येक चित्रपटात वेगळेपण देत आलो आहे, मुळात पात्र साकारताना मी सतीश नसतो. त्या पात्रात घुसून काम करणे हा माझा पिंड आहे, म्हणूनच मी आजवर इथे टिकू शकलो, असे ते म्हणतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांची मैत्री हा म्हटले तर चर्चेचा विषय असतो, पण अशा पद्धतीची मैत्री टिकवणे प्रत्येकालाच साध्य होते असे नाही. ‘आजकाल या क्षेत्रात कोणीच कोणाचे नसते, पण त्या काळी तसे नव्हते. सर्व जण एकमेकांच्या मदतीला धावून जायचे. काही कलाकारांसोबत झालेली माझी मैत्री आजही टिकून आहे. अनुपम, अनिल कपूर हे तर माझे मित्र नसून कौटुंबिक सदस्य आहेत. माझ्या सर्व सुखदु:खात त्यांची मला भक्कम साथ मिळाली आहे. एवढेच नव्हे तर किरण खेर, जावेद अख्तर, नादिरा बब्बर आणि सर्व कलाकारांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले.

नव्वदच्या दशकातील चित्रपट आणि आताच्या चित्रपटांतील बदलाविषयी ते सांगतात, काळानुसार आशय-विषयात बदल होणे स्वाभाविक आहे. कारण आवड-निवड आणि प्रेक्षक वर्ग बदलत असतो. त्या काळातील अभिनय आणि आताच्या अभिनयातही बराच फरक आहे. तेव्हा भूमिका साकारताना ती थोडी नाटकीपणाने मांडली जायची. कारण तांत्रिकदृष्टय़ा हे क्षेत्र तितके सक्षम नव्हते. त्या काळातील चित्रपटगृहांमधील यंत्रणाही तितक्या ताकदीच्या नव्हत्या. पण आता कॅमेरा, ध्वनी सगळेच तंत्रज्ञान वेगात धावते आहे. आपल्या श्वासाचेही आवाज टिपता येतील एवढी यंत्रणा आता सज्ज आहे. त्यामुळे अभिनय त्या तुलनेने सौम्य झाला आहे, असे ते स्पष्ट करतात. नवीन दिग्दर्शकांसोबत काम करताना येणाऱ्या अनुभवांबद्दल बोलताना आताचे दिग्दर्शकही निडर झाले आहेत, असे ते म्हणतात. एखादा विषय ठामपणे मांडण्याची धमक त्यांच्यात आल्याने चित्रपटात विविध प्रयोग होत आहेत. आणि जुन्या कलाकारांनी नव्या पिढीशी जुळवून घेणे जास्त गरजेचे आहे. मी आजही काम करताना स्वत:ला दिग्दर्शकाच्या हवाली करतो. ही माझ्या कामाची पद्धत असली तरी त्याचे सकारात्मक परिणाम मी अनुभवले आहेत. पण चित्रपटातील भारतीय लहेजा कधीच हरवता कामा नये. भारताची संस्कृती हा चित्रपटाचा आत्मा आहे. त्यामुळे इथून पुढच्या चित्रपटांतही भारतीय बाज टिकून राहील अशी आशा आहे, असे ते म्हणतात.

मराठी रसिक हा हिंदीतील नायक-नायिकांवर प्रेम करणारा रसिक नाही. त्यांना सतत नावीन्यपूर्ण आशय लागतो. आज मराठी चित्रपट परदेशातही पहिला जातो. मी स्वत: मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. म्हणजे दादा कोंडकेंचे विनोदी चित्रपट आणि जब्बार पटेल यांचा ‘सिंहासन’ एकाच वेळी पाहणारा आणि त्याला दादा देणारा हा रसिक वर्ग आहे. ‘सिंहासन’सारख्या चित्रपटातून ज्या पद्धतीचे राजकीय भाष्य झाले आहे ते पुन्हा कोणत्याच चित्रपटात आढळले नाही. ‘लालबाग परळ’, ‘सैराट’, ‘रंगा पतंगा’, ‘रिंगण’ असे अनेक चित्रपट माझ्या मनात घर करून बसले आहेत.     – सतीश कौशिक

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish kaushik mpg
First published on: 25-08-2019 at 00:39 IST