बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने देखील त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा एका व्हिडीओद्वारे दिल्या आहेत. मात्र फक्त शुभेच्छा नाही तर त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शाहरूखने दिली आहे.

शाहरूखने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे. “२०२० हे वर्ष सगळ्यांसाठी त्रासदायक होतं. मला असं वाटतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते, तेव्हा एकच मार्ग समोर असतो आणि तो म्हणजे पुढे जाण्याचा. मी प्रार्थना करतो की २०२१ हे वर्ष सगळ्यांसाठी आनंदाचे जावो. माझी टीम सध्या माझ्यासोबत नसल्याने मी हा व्हिडीओ स्वत: शूट केला आहे आणि २०२१ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना मोठ्या पडद्यावर भेटेन”, असं तो या व्हिडीओमध्ये बोलतो.

आणखी वाचा : नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये हृतिकचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

शाहरूख यशराजच्या ‘पठाण’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहेत. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.