Sharad Ponkshe Reaction on Malegaon Case : २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल १७ वर्षांनी आज (३१ जुलै, गुरुवार) निकाल लागला. याप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालय विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) द्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.

याप्रकरणी संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. यावर आज (३१ जुलै, गुरुवार) विशेष न्यायालयाने निकाल देताना १७ वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा याप्रकरणी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पोंक्षे यांनी हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही, हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह खोटा असल्याचं म्हटलं.

हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही : शरद पोंक्षे

याबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, “२००८ पासून २०२५ पर्यंत… म्हणजे जवळजवळ १७ वर्षे वाट पहावी लागली. शेवटी न्याय मिळाला. हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह खोटा होता. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. भारताचा आणि जगाचा इतिहास काढून पाहिला तर, हिंदूंनी जाऊन कुणाला तरी मारलंय, हिंदूनी विध्वंस केलाय, हिंदूंनी मशिद पाडलीय… पाडलीय म्हणजे मुळ मशिद पाडलीय आणि मंदिर उभं केलंय किंवा चर्च उभं केलंय असं कधीही झालेलं नाही.”

आम्ही कधीही हिंसक नव्हतो, हिंदू कायमच सहिष्णू : शरद पोंक्षे

यानंतर ते म्हणाले, “इतिहातल्या राष्ट्रपुरुषांनी, सेनापतींनी आलेलं आक्रमण थोपवण्यासाठी, आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठीच हातात शस्त्रे घेतली आहेत. आम्ही कधीही हिंसक नव्हतो. हिंदू कायमच सहिष्णू आहे. सगळं खोटं असल्याचं आज सिद्ध झालं आहे आणि मी खूप आनंदात आहे.”

यापुढे ते असं म्हणाले, “इतिहासात पहिल्यांदा हिंदू दहशतवाद असा शब्द वापरण्यात आला. हिंदू दहशतवाद खोटा आहे; तो कधी असू शकत नाही हे नॅरेटिव्ह खोटं आहे आणि ते कोर्टात सिद्ध झालं आहे. त्यामुळे आम्ही हिंदू खुश आहोत. हिंदू ही आमची ओळख आहे, हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही. पण २००८ ला जाणीवपूर्वक हिंदूसुद्धा दहशतवादी असतात हा नॅरेटिव्ह सेट झाला होता आणि त्यातून सगळे मुक्त झाले आहेत.”