करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान हा लॉकडाउन सुरु राहणार आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. मात्र याच लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चित्रविचित्र बातम्याही समोर येताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बाहेर फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर एका दिग्दर्शकाने शेअर केला आहे. पण लगेच सोनाक्षीने उत्तर देत तो फोटो आधीचा असल्याचे म्हटले आहे.

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक विवेक रंजन अग्नीहोत्री याने नुकताच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी एका चित्रपटाचे चित्रीकरण संपवून निघाली असल्याचे म्हटले जात आहे. तिचा हा फोटो शेअर करत त्याने सध्या देशात सुरु असलेल्या परिस्थितीमध्ये कोण चित्रीकरण करत? असे कॅप्शन दिले होते. त्याचे हे ट्विट पाहून सोनाक्षीने उत्तर देत चांगलेच सुनावले आहे.

‘सध्याच्या परिस्थितीमध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि खोट्या बातम्या देणाऱ्या लोकांना थांबवण्याची काय प्रक्रिया आहे? घरात बसलेला, सोशल डिस्टेंसिंग पाळणारा आणि शूट न करणारा एक जबाबदार नागरिक म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे’ असे सोनाक्षीने म्हटले आहे. तिने तिचे हे ट्विट मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑफिसला टॅग केले आहे.

काही दिवसांपूर्वी सोनाक्षीला रामायणातील उत्तर देता न आल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तसेच अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील तिच्यावर निशाणा साधला होता.