अचूक आणि उत्तम गायकीसाठी सोनू निगम प्रसिद्ध आहे. अनेक गाणी त्यानं वन टेक गायली आहेत. मात्र, चीटर या चित्रपटातलं रेकॉर्ड झालेलं गाणं सोनूला पुन्हा गावं लागलं. अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्यामुळे सोनूला एकच गाणं दोन वेळा गावं लागलं.
त्याचं झालं असं की, नव्या दमाचा संगीतकार अभिजीत नार्वेकरनं चीटर या चित्रपटासाठी चार गाणी संगीतबद्ध केली. त्यातली दोन गाणी सोनू निगमनं गायली आहेत. त्यापैकी “मन माझे….हे गाणं सोनूच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण झालं. काही काळानं गाण्यांचं काम साऊंड आयडियाज या स्टुजिओत सुरू होतं. त्याच वेळी एका दुसऱ्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी सोनू निगमही त्याच स्टुडिओमध्ये आला होता. त्यावेळी त्याची आणि फणसेकर यांची भेट झाली. त्यावेळी सोनूनं चीटरच्या गाण्यांच्या चित्रीकरणाविषयी विचारलं. फणसेकर यांनी गाणी तयार झाल्याचं सांगितलं. सोनूनं गाणी पहाण्याची इच्छा व्यक्त केली. फणसेकर सोनूला घेऊन स्टुडिओत आले. त्यांनी सोनूला गाण्याचं चित्रीकरण दाखवलं. त्यातलं “मन माझे…” हे गाणं पाहून सोनूनं आधी रेकॉर्ड केलेलं गाणं रद्द करायला सांगितलं. सोनूूनं गायलेल्या गाण्यावर वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांनी फारच उत्तम अभिनय केला होता. त्यांच्या अभिनयाच्या तोडीचं गाणं आपण गायलेलो नाही, असं सोनूला वाटलं. म्हणून त्यानं ते फायनल झालेलं गाणं रद्द करायला लावलं. संगीतकार अभिजित नार्वेकरला सांगून लगेच रेकॉर्डिंग करायला सांगितलं. पुढच्या काही वेळात सोनूनं हे गाणं पुन्हा गाऊन रेकॉर्ड करण्यात आलं.
‘आपल्यामुळे सोनू निगम पुन्हा गाणं गायल्याचा किस्सा वैभव आणि पूजाला कळल्यावर दोघंही भारावून गेले. ‘सोनू निगम यांनी आमच्या अभिनयाचं कौतुक करून गायलेलं गाणं पुन्हा गाणं हा आमचा सन्मान आहे. एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराचं अशा पद्धतीनं कौतुक करणं फारच आनंददायी आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“चीटर” हा आगळा वेगळ्या धाटणीचा सिनेमा येत्या १० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu nigam recorded a song twice for marathi movie