करोना काळात गरिबांसाठी ‘मसीहा’ ठरलेला अभिनेता सोनू सूद न थकता लागोपाठ लोकांच्या मदतीसाठी धडपड करतोय. आता तर तो करोनाबाधितांसाठी ऑक्सिजन प्लांटच उभारणार आहे. एकूण तीन ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्याने काम सुरू केलं असून यातील एक आंध्र प्रदेशमधल्या कुरनूल, दुसरा प्लांट नेल्लोर जिल्ह्यामध्ये तर तिसरा प्लांट हा अटमाकूर जिल्ह्यात उभारण्यासाठीचं काम सुरू करणार आहे. यासाठी तो आणखी काही अनुभवी लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करतोय. सोनू सूद आणि त्याची टीम सध्या या ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या योजनेसाठी काम करताना दिसून येत आहेत.

अभिनेता सोनू सूदने नुकतंच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीय. या ट्विटमध्ये त्याने ज्या रूग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार आहेत त्या रूग्णालयाचे फोटोज देखील शेअर केले आहेत. आंध्र प्रदेशमधल्या कुरनूल गव्हर्नमेंट हॉस्पिटल, नेल्लोर आणि अटमाकूर या तीन जिल्हा रूग्णालयात हे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी एस. राम सुंदर रेड्डी यांनी सांगितलं की, “मी अभिनेता सोनू सूदचा खूप आभारी आहे…माणूसकी या नात्याने त्यांनी १५० ते २०० करोनाबाधितांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम सुरू केलं आहे…यामुळे इथल्या करोनाबाधितांवर उपचार होऊ शकतील…”. यावर अभिनेता सोनू सूद म्हणाला, “भारतातील आरोग्य यंत्रणेमध्ये सुधार करण्याची गरज आहे, विशेष करून गावपातळ्यांवर…मला असं वाटतं हा ऑक्सिजन प्लांट उभारल्यानंतर तिथल्या करोनाबाधितांवर उपचार करणं सोप्पं होईल…आंध्र प्रदेशनंतर आम्ही जून-जुलैमध्ये आणखी इतर राज्यात देखील हा प्लांट उभारणार आहोत…सध्या आम्ही वेगवेगळ्या राज्यातील रूग्णालयाची यादी काढत आहोत जिथे हा ऑक्सिजन प्लांट उभारू शकतो.”


ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी अभिनेता सोनू सूदने महापालिका आयुक्तांकडून परवानगी देखील घेतली आहे. येत्या जूनमध्ये या ऑक्सिजन प्लांटचं काम पूर्ण होऊन ते करोनाबाधितांसाठी सुरू करणार आहेत. या प्लांटमधून आजुबाजुच्या गावांमध्ये सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतो.

करोना काळात अभिनेता सोनू सूद त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बराच सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच लोकांना करत असलेल्या मदतीबाबत प्रत्येक अपडेट देत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला त्याचे चाहते लाइक आणि कमेंट्स करत त्याच्या कामाबद्दल कौतूक करीत असतात.