Sunjay Kapur Assets Dispute Case: दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात पूर पत्नी आणि विद्यमान पत्नीमध्ये न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूरची मुले समायरा (२०) आणि कियान (१५) यांनी सावत्र आई प्रिया सचदेवच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवंगत वडील संजय कपूर यांच्या संपत्तीत योग्य प्रमाणात वाटा मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. दोन पत्नींमध्ये संतप्तीसाठी भांडण सुरू असताना शुक्रवारी न्यायालयात मात्र त्यांच्या दोन वकिलांमध्येच खडाजंगी उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी न्यायाधीशही दोन्ही वकिलांकडे पाहत राहिल्या. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांची बाजू वकील राजीव नायर मांडत आहेत. तर करिष्मा कपूर यांच्या मुलांची बाजू महेश जेठमलानी मांडत आहेत. करिश्मा कपूर या संजय कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. या जोडप्याला समायरा आणि कियान अशी दोन मुले आहेत. संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रातील महत्त्वाची कागदपत्रे आणि काही माहिती लपवली असल्याचा आरोप प्रिया सचदेव यांच्यावर करण्यात आला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ज्योती सिंह यांच्यासमोरच वकील नायर आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगी झाली. या भांडणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, वकील नायर बोलत असताना महेश जेठमलानी काहीतरी बोलायला जातात. तेव्हा नायर संतापून म्हणतात, “कृपया मधे मधे बोलू नका. मला तुमच्या अडथळ्यांची सवय नाही.” यानंतर जेठमलानीही संतापून म्हणतात, “यू शुल्ड गेट टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन” या इंग्रजी म्हणीचा अर्थ आहे की, तुम्ही जशी वागणूक इतरांना देता, तशीच वागणूक तुम्हालाही मिळेल.

जेठमलानी पुढे म्हणतात, मी बोलताना तुम्ही अडथळे आणत होता, आता माझ्यावर ओरडू नका. थोडे तरी सौजन्य दाखवा. यानंतर नायर पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात, मात्र जेठमलानी त्यांना मध्येच थांबवून म्हणतात की, जर तुम्ही माझ्यावर ओरडलात तर तुम्हालाही ऐकावे लागेल. मी काही ऐकून घेणार नाही.

संजय कपूर यांच्या संपत्तीचा वाद काय?

उद्योगपती संजय कपूरची तिसरी प्रिया सचदेव आणि त्यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यात ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेसंदर्भात वाद सुरू आहे. करिश्माच्या मुलांनी प्रियावर बनावट मृत्युपत्र तयार करून त्यांना वारसाहक्कातून वगळल्याचा आरोप केला आहे.

करिश्मा व संजय यांचा १३ वर्षांचा संसार

२००३ मध्ये संजय कपूर व करिश्मा कपूरचे लग्न झाले होते. ते २०१६ पर्यंत एकत्र होते. त्यांना समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत. करिश्माशी घटस्फोट झाल्यानंतर २०१७ मध्ये संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले. संजय याचं जून २०२५ मध्ये लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. संजय कपूर यांची मालमत्ता ३०,००० कोटी रुपये आहे.