अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई पोलीस सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मुंबई पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीआयच्या विनंतीवरून मुंबई पोलीस रियाला सुरक्षा पुरवणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, तपासासाठी रिया जेव्हा कधी तिच्या घरातून DRDO गेस्ट हाऊससाठी बाहेर पडले तेव्हा तिला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येईल.
माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचं म्हणत रियाने सुरक्षेची मागणी केली होती. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिचे वडील इमारतीत शिरत असताना पत्रकार व छायाचित्रकार त्यांच्याभोवती घोळका करताना दिसत आहेत. ‘हा माझ्या इमारतीच्या कम्पाऊंडमधला व्हिडीओ आहे. त्यात दिसणारी व्यक्ती माझे वडील इंद्रजित चक्रवर्ती (निवृत्त लष्कर अधिकारी) आहेत. ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे. आम्ही स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. परंतु कोणीच आमची मदत करत नाहीये. आम्ही कसं जगायचं? मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवावी’, अशी पोस्ट रियाने लिहिली होती.
आणखी वाचा : ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली
दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला.