अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या वेळी सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचा खुलासा सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपने केला होता. आता त्यापाठोपाठ सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या नात्या विषयी खुलासा केला आहे.

सप्टेंबर २०१८ पासून ते २०२० जुलैपर्यंत सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसची रईस नावाचा व्यक्ती देखरेख करत होता. त्याने नुकताच आयएएनएसला दिलेल्या माहितीमध्ये सुशांत जानेवारी महिन्यात साराला प्रपोज करणार असल्याचे म्हटले आहे.

‘२०१८ पासून सारा अली खान सुशांतसोबत फार्महाऊसवर येत होती. जेव्हा जेव्हा ते फार्महाऊसवर यायचे तीन ते चार दिवस राहायचे. डिसेंबर २०१८मध्ये जेव्हा ते थायलंड ट्रिपवरुन आले होते तेव्हा ते विमानतळावरुन थेट फार्महाऊसवर आले होते. ते रात्री १० ते ११च्या दरम्यान आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र देखील होते’ असे रईसने आयएएनएसशी बोलताना म्हटले.

आणखी वाचा : बॉलिवूड माफियांमुळे सारा-सुशांतचा ब्रेकअप झाला? सुशांतच्या मित्राची पोस्ट व्हायरल

पुढे तो म्हणाला, ‘सारा मॅडम खूप चांगल्या पद्धतीने वागल्या होत्या. त्या अभिनेत्री असल्यासारख्या वागत नव्हत्या. त्या खूप साध्या आहेत. सुशांत प्रमाणेच त्यांनी देखील फार्महाऊसवर काम करणाऱ्या बाईला मावशी आणि मला रईस भाई असा आवाज दिला. सुशांत सरांच्या कर्मचार्‍यांबद्दल त्यांना खूप आदर होता.’

‘मला आठवतेय की अब्बास भाई (सुशांतचा मित्र) यांनी जानेवारी २०१९ मध्ये सुशांत सरांच्या वाढदिवशी दमण ट्रिपला जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितली होती. पण ती ट्रिप रद्द झाली. सुशांत सर दमण ट्रिपच्यावेळी साराला प्रपोज करण्याचा विचार करत होते. त्यांना सराला गिफ्ट द्यायचे होते आणि त्यांनी तिच्यासाठी काही तरी ऑर्डरपण केले होते. पण ट्रिप रद्द झाली. त्यानंतर केरळला जाण्यासाठी ट्रिप आयोजित केली. पण ती देखील रद्द झाली. त्यानंतर फ्रेब्रुवारी किंवा मार्च २०१९मध्ये त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे मी ऐकले. जानेवरी २०१९ नंतर सारा मॅडम फार्महाऊसवर आल्याच नाहीत’ असे रईस पुढे म्हणाला.