Milind Gawali Instagram Post : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सर्वच प्रेक्षकांची आवडती मालिका होती. या मालिकेतील सर्वांच्याच भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची अनिरुद्ध ही भूमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेनंतर मिलिंद गवळी आता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मिलिंद गवळी ‘मनपसंद की शादी’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

‘कलर्स हिंदी’ वाहिनीवर लवकरच ‘मनपसंद की शादी’ ही नवीन मालिका नुकतीच सुरू झाली आहे आणि यात मिलिंद गवळी मुख्य नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री ईशा सूर्यवंशी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून मिलिंद गवळी तिच्या वडिलांची (राजाराम शिंदे) भूमिका साकारत आहेत. नुकताच मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून याबद्दल मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळी असं म्हणतात, “एखादं सॅटेलाईट जसं रॉकेट अंतराळात पाठवायचं ठरतं आणि त्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेतात, तसंच काहीसं माझं झालं होतं. दिवस-रात्र फक्त एकाच गोष्टीचा विचार – ‘मनपसंद की शादी’ या मालिकेच्या प्रसारणाचा… आणि अखेर तो क्षण उजाडला. काऊंटडाउन सुरू झालं… ६…५…४…३…२…१… आणि ११ ऑगस्टच्या रात्री १० वाजता, कलर्स टीव्हीवर मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांसमोर आला.”

यापुढे ते म्हणतात, “एकदा उड्डाण घेतल्यावर रॉकेट जसं अंतराळात जाऊन आपलं काम सुरू करतं, तसंच आता या मालिकेशी जोडलेले सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवण्यासाठी मेहनत करत आहेत. ‘राजश्री’ हे नाव ऐकूनच मी प्रचंड आनंदी झालो. मनात आलं, ऑडिशनसाठी बोलावतील. पण त्यांनी थेट ऑडिशनशिवायच बोलावलं. त्यामुळे आणखीच आनंद झाला. काही दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, “आपली निवड झालेली नाही, पण भविष्यात नक्की एकत्र काम करू.” तेव्हा थोडं वाईट वाटलं, पण मी दाखवलं नाही. त्यांना मी सहज म्हटलं, “मी गेली तीन दशकं राजश्रीबरोबर काम करण्यासाठी वाट पाहतोय, थोडी आणखी वाट बघेन.” त्यावर ते हसले आणि म्हणाले, “अरे, हे तर मी मजेत बोललो! तुमची निवड केवळ राजश्रीनेच नाही, तर कलर्स टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही केली आहे.” हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला आणि जबाबदारीची जाणीवही.”

पुढे मिलिंद गवळी म्हणाले, “निसर्गाच्या सान्निध्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं. नंतर गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये तीन भव्य सेट उभारण्यात आले. त्यात आमचा शिंदेंचा वाडा खास करून जबरदस्त तयार केला आहे. जेव्हा जेव्हा मी त्या सेटवर जातो, तेव्हा तेव्हा मला खरंच असं वाटतं की, मी जणू एखाद्या वेगळ्याच दुनियेत प्रवेश करत आहे.”

यानंतर मिलिंद गवळींनी असं म्हटलंय, “हा वाडा एवढा सुंदर आहे की, प्रत्यक्ष आयुष्यात कुणालाही तिथे राहण्याची संधी मिळणं कठीण. कदाचित मी कधीच ‘राजाराम शिंदे’सारखं आयुष्य जगू शकणार नाही, पण अशा व्यक्तिरेखांमधून, अशा कथा जिवंत करताना त्या जगाचा अनुभव घेता येतो. यासाठी स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो. कलाकार म्हणून जेव्हा एक सकारात्मक भूमिका करायला मिळते, तेव्हा मनातून एकच आवाज येतो – जी ले अपनी जिंदगी!”