Rohit Purohit Sheena Bajaj : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्याने गुड न्यूज दिली आहे. मालिकेत अरमान पोद्दार ही भूमिका करणारा अभिनेता रोहित पुरोहित लवकरच बाबा होणार आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत सध्या अरमान बाबा होणार, असाच ट्रॅक सुरू आहे. दुसरीकडे, खऱ्या आयुष्यातही रोहितच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे.

रोहितने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये त्याने फोटो व दुसऱ्या पोस्टमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. रोहित व त्याची पत्नी शीना बजाज लग्नानंतर ६ वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

रोहित व शीनाने इन्स्टाग्रामवर एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत शीना तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. या व्हिडीओत रोहित व शीना खूप आनंदी दिसत आहेत. फोटोंमध्ये रोहित आनंदाने भावुक झालेला दिसत आहे.

शीनाने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादांची गरज आहे. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला एवढंच हवं आहे. माझ्या आयुष्यातील मातृत्वाचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी मी देवाकडे शक्ती आणि धैर्यासाठी प्रार्थना करतेय. माझा हा प्रवास सुरळीत पूर्ण व्हावा. मी माझ्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत माझ्या चाहत्यांबरोबर सर्वात मोठी बातमी शेअर करत आहे.”

पाहा व्हिडीओ-

रोहित आणि शीनाच्या पोस्टवर चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रोहितच्या इंडस्ट्रीतील मित्रांनीही कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे. पंखुरी अवस्थी, विभूती ठाकूर, अनिता राज, सलोनी संधू यांच्यासह अनेक कलाकारांनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. रोहितचे चाहते हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत.

अभिनेत्री पंखुरी अवस्थीने लिहिलं, “अभिनंदन मित्रांनो! तुम्हा दोघांनाही खूप खूप प्रेम.” ज्येष्ठ अभिनेत्री अनिता राज यांनी “सुंदर जोडप्याचे अभिनंदन. गुरुजी तुम्हा सर्वांना नेहमीच भरपूर आशीर्वाद देवोत. मी खूप आनंदी आहे,” अशी कमेंट केली.

रोहित पुरोहित व शीना बजाज यांचे लग्न २२ जानेवारी २०१९ रोजी जयपूरमध्ये झाले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये, रोहितने सांगितलं होतं की शीनाने त्यावेळी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा प्रेग्नन्सी ट्रॅक पाहण्यास नकार दिला होता. याचा भावनिकदृष्ट्या स्वतःवर मोठा परिणाम झाला, असंही रोहित म्हणाला होता.