छोट्या पडद्यावरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत दाखवली जाणारी पात्रं प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. त्यामुळे प्रत्येक मालिकेचा एक वेगळा चाहता वर्ग असतो. अशातच आता छोट्या पडद्यावर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे जाणवते. ती मालिका म्हणजे ‘कोण होतीस तू काय झालीस तू’.
लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ही मालिका सुरू होणार असून, या मालिकेत कलाकारांची मोठी फौज असल्याचे पाहायला मिळते. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू व अभिनेता मंदार जाधव मुख्य भूमिकांत झळकणार आहेत. मंदार-गिरिजासह आणखी काही अनुभवी कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
‘कोण हातीस तू काय झालीस तू’ या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने, अभिनेते वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर यांसारखी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. तर सुकन्या मोने या मंदार जाधवच्या आईच्या भूमिकेत आणि वैभव मांगले कावेरी म्हणजेच गिरिजा प्रभूच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर प्रमोशनदरम्यान या कलाकारांनी अनेक मुलाखती दिल्याचे पाहायला मिळते. अशातच एका मुलाखतीत अभिनेते वैभव मांगले यांनी मालिकेत त्यांच्या मुलीची भूमिका साकारणारी गिरिजा व मंदार यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैभव मांगले गिरिजाबद्दल बोलताना म्हणाले, “मंदार व गिरिजा टेलिव्हिजनवरील स्टार आहेत. त्यांचा एक शो (‘सुख म्हणजे नक्की काय असतं’) चार वर्षं चालला; पण तरीसुद्धा त्यांच्या डोक्यात हवा नाहीये आणि ही खूप छान गोष्ट आहे. त्यातल्या त्यात गिरिजा माझ्या मुलीची भूमिका साकारत असल्यानं तिच्याशी माझं मुलीसारखंच नातं निर्माण झालं आहे. तीसुद्धा माझीच मुलगी असल्यासारखं मला अनेक प्रश्न विचारते. माझ्यासाठी काय काय खायला घेऊन येत असते. त्यामुळे तिच्याशी चांगलं नातं निर्माण झाल्याचा आनंद आहे.”
दरम्यान, या आगामी मालिकेच्या प्रमोशननिमित्त संवाद साधताना मंदार जाधवनेही त्याला सुकन्या मोने व वैभव मांगले यांच्यासह काम करण्याची संधी मिळतेय ही मोठी गोष्ट असल्याचे म्हटले होते. लवकरच ही मालिका २८ एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रेक्षकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता आहे. मंदार-गिरिजा यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षक मंदार-गिरिजाला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते.