अभिनेत्री सायली देवधर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजवर ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘लग्नाची बेडी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. या सर्व मालिकांमध्ये तिच्या खूपच हटके प्रेमकहाण्या पाहायला मिळाल्या आहेत. पण, फक्त ऑनस्क्रीनच नाही तर सायलीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी देखील तितकीच खास आहे. याबाबत तिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
अभिनेत्री सायली देवधर व गायक गौरव बुर्से या दोघांनी ‘सुलेखा तळवलकर’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे. सायली म्हणाली, “मला कायम गायक असलेल्या मुलाशी लग्न करायचं होतं आणि ही इच्छा मी माझ्या रुममेटला सांगितली, तेव्हा तिने माझा एक भाऊ गायक आहे असं म्हणत गौरवचा फोटो दाखवला. पण, तेव्हा हा विषय काही पुढे गेला नाही.”
पुढे त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगताना गौरव म्हणाला, “माझी बहीण सायलीची रुममेट होती आणि त्यांच्यासह अजून दोन मुली राहायच्या. तेव्हा आम्ही चार-पाच जणांनी भेटायचं ठरवलं. आम्ही चौघे खूपदा भेटायचो, पण सायलीला तिच्या कामामुळे एकदाही जमलं नाही. मग एकदा ३१ डिसेंबरच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी यांच्या फ्लॅटवर भेटण्याचं ठरवलं आणि तेव्हा पहिल्यांदा आमची भेट झाली आणि जेव्हा मी पहिल्यांदा सायलीला पाहिलं होतं तेव्हाच मला ती आवडली होती. त्या रात्री आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या, मजा मस्ती केली. पण, बाकीचे सगळे नंतर झोपून गेले आणि आम्ही पहाटे ३-४ वाजेपर्यंत एकमेकांशी गप्पा मारत होतो.”
पुढे सायली याबाबत बोलताना म्हणाली, “यानंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि गौरव माझं मुंबईत काम आहे असं सांगून बऱ्याचदा मला भेटण्यासाठी यायचा आणि मला वाटायचं की ह्याचं खरंच काम आहे. पुढे दोन अडीच महिन्यांच्या ओळखीनंतर त्याने मला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं.” यानंतर दोघांनी २०२० साली एकमेकांसह लग्न केलं. आज यांच्या लग्नाला जवळपास पाच वर्ष झाली आहेत.
दरम्यान, सायलीच्या ‘लग्नाची बेडी’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला, तर तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामध्ये तिच्यासह अभिनेत्री रेवती लेले, संकेत पाठक, अमृता मालवदकर हे कलाकार पाहायला मिळाले होते.