सोशल मीडियाच्या काळात कोणाचे किती फॉलोअर्स आहेत यावरून बऱ्याच गोष्टी ठरवल्या जातात. बऱ्याचदा तर कलाकारांची एखाद्या भूमिकेसाठी निवड करताना या गोष्टी पाहिल्या जातात. अनेक कलाकार मंडळी केवळ सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्याने भूमिका हुकल्याचं सांगताना दिसतात, तर दुसरीकडे बरेचसे कलाकारही अभिनयासह सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहात असतात.

कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या कामासंदर्भातील घडामोडी, आगामी प्रोजेक्ट, त्यांच्या कामाचा अनुभव या सर्व गोष्टी चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील पोस्ट करत तिचं मत व्यक्त केलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील अभिनेत्री सुरभी भावेने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे.

सुरभीने स्टोरी पोस्ट करत “एक खंत व्यक्त करणार आहे. कितीही चांगलं काम केलं तरी प्रसिद्धी काही ठराविक चेहऱ्यांनाच मिळते की तिथेही सगळा फॉलोअर्सचाच गेम असतो?” असं म्हटलं आहे. सुरभीसह यापुर्वीदेखील अनेक कलाकार याबाबत तक्रार करताना दिसले. बऱ्याचदा ऑडिशनदरम्यान लूक टेस्ट झाली, ऑडिशन व्यवस्थित झालं, पण नंतर फक्त फॉलोअर्स जास्त असल्याने कुठल्यातरी इन्फ्लुएन्सरची निवड करण्यात आली, असं अनेक कलाकार मुलाखतींमध्ये सांगताना दिसतात.

सुरभी भावे इन्स्टाग्राम स्टोरी

सुरभी सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत ती वल्लरी हे पात्र साकारताना दिसतेय. तर या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनयासह सुरभी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असून ती तिच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील सर्व कलाकारांचे एकमेकांसह चांगले संबंध असून सुरभी बऱ्याचदा सेटवर तिच्या सहकलाकारांसाठी डब्बा घेऊन जात असते. याविषयी तिचे सहकलाकार अनेक मुलाखतींमध्ये बोलताना दिसतात.

सुरभीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘भाग्य दिले तू मला’, ‘राणी मी होणार’, ‘चंद्रमुखी’, ‘पावनखिंड’ यांसारख्या मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत; तर सध्या ती ‘स्टारप्रवाह’ वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.