Aishwarya and Avinash Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर हे मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटक याबरोबरच हे कलाकार जोडपे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

विनोदी रील्स, नवीन-जुन्या गाण्यांवर डान्स यामुळे त्यांची मोठी चर्चा होताना दिसते. आता हे जोडपे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, एका मुलाखतीत त्यांनी त्यांचे कोणत्याच बाबतीत एकमेकांशी एकमत होऊच शकत नाही, असे वक्तव्य केले आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकतीच ‘द अनुरूप शो’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत दोघांनी ते प्रेमात कसे पडले, कोणी लग्नासाठी विचारलं, त्यांचं नातं एकमेकांशी कसं आहे, एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे, याबरोबरच सोशल मीडियावरील रील्स, ट्रोलिंग याबद्दल वक्तव्य केले.

ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?

या मुलाखतीत त्यांना विचारले की तुमची निर्मिती संस्था आहे, तुम्ही निर्माते म्हणून एकत्र काम करता, तुम्ही कलाकार म्हणून दुसऱ्या दिग्दर्शकाकडे एकत्र काम करता. अनेक जोडपी एकत्र काम करत असतात, अशा जोडप्यांना काय सांगाल? यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “त्या-त्या ठिकाणी तो-तो विचार करावा. जर दोन विचार एकत्र केले, तर त्यात खूप गोंधळ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी ज्या गोष्टींमधील ज्याला जास्त कळतं त्याने पुढाकार घ्यावा किंवा त्याच्याकडे जबाबदारी द्यावी.

आता आमच्या निर्मिती संस्थेच्या सगळ्या गोष्टी अविनाशच बघतो, कारण मला त्यामध्ये गतीच नाही. मला लोकांशी बोलता येत नाही, तर मी मागे असते. आम्ही जेव्हा नाटक प्रोड्यूस केलं होतं तेव्हा कलाकारांचे, थिएटरचे पैसे देणं; व्यवहाराच्या या सगळ्या गोष्टी मी बघते. पण, प्रयोग कुठे, कसा लावायचा त्याचे निर्णय तो घेतो. मला असं वाटतं की, हा सोपा नियम आहे की दोघांपैकी ज्याला जास्त कळतं तिथे त्यांनी पुढाकार घेऊन त्या गोष्टी कराव्यात.

घर आणि करिअर यामध्ये एकत्र असलो तरी त्याची सरमिसळ करता कामा नये. घरातल्या गोष्टी घरातच राहायला पाहिजेत. त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ नये. ही गोष्ट पाळली तरी इतर गोष्टी नीट होतात.

एकमेकांना स्पेस देण्याबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, एकमेकांना गृहीत धरू नये. एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे. तर अविनाश नारकर म्हणाले की, प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व असतं. प्रत्येकाची वेगळी ओळख असते. त्याचा आदर केला पाहिजे. एकमेकांविषयी अतोनात प्रेम वाटलं पाहिजे. तुमच्या वागण्या-बोलण्यातून स्पेस ही सहजपणे देता आली पाहिजे.

“प्रेमाचा प्रभाव जसा कमी होतो, त्यावेळी…”

आताच्या पिढीला लग्नाची भीती वाटते किंवा लग्नाआधी वेगळ्या, नंतर वेगळ्या गोष्टी, असे अनेक विचार असतात. त्यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “प्रेम हा एक मुद्दा आहे. याबरोबरच विश्वासही असला पाहिजे. आधीच्या काळात प्रेम विवाह केला की टिकेलच असा एक विश्वास असायचा. कारण आपण काहीही झालं तरी आपण तडजोड करायला तयार असतो.”

तडजोड ही असतेच, जेव्हा आपण ती करायला तयार असू तेव्हा मग लग्नाआधी किंवा नंतर असं काही बदलत नाही. लग्नाआधी आपण प्रेमाखातर अनेक गोष्टी केलेल्या असतात. पण, प्रेमामुळे त्या जाणवत नाहीत. त्या प्रेमाचा प्रभाव जसा कमी होतो, त्यावेळी आपल्याला जाणवतं की त्याने आपल्यासाठी अमुक एखादी गोष्ट केली नाही, ती ॲडजेस्टमेंट असते. ती स्वीकारून आपण आपलं नातं फुलवायला पाहिजे. मग कमिटमेंट या कमिटमेंट म्हणून समोर येत नाहीत, तर ते एकमेकांबरोबर बॉण्डिंग होतं.”

“कमिटमेंट म्हणून जेव्हा एखादी गोष्ट केली जाते, तेव्हा त्यामध्ये अनैसर्गिकपणा येतो. त्या गोष्टी त्रासदायक वाटतात. मग कदाचित नाती तुटायला लागतात. हा मुद्दा आजकाल जास्त येतो. आजकालची मुलं आर्थिकदृष्ट्या विचार करतात. माझे पैसे, स्पेस, करिअर हा विचार मुले करतात. यामध्ये एकमेकांच्या सोयीने एकमेकांसाठी जगलात तर मला वाटतं की सगळे मुद्दे गौण होतात.”

“तुम्ही स्वत: भोवती कवच बांधून एकमेकांशी जगत आलात तर ती कवच एकमेकांना आपटणारच. उलट एकमेकांशी सौम्यपणे वागलात, तर तुम्ही एकमेकांमध्ये मिसळून जाऊ शकता. ती गोष्ट आजकालच्या धकाधकीच्या जीवनात होत नाही. तर अविनाश नारकर म्हणाले की बोलून गोष्टी सुटतात, त्या-त्या वेळी बोललं पाहिजे.”

दरम्यान, अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत.