अभिनेता अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज यांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अमेयने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत, त्यामुळे आज त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अमेय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल तसेच दैनंदिन आयुष्यातील घडामोडींबद्दलच्या अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहात असतो.

‘अशी’ सुरू झाली अमेय-साजिरीची लव्हस्टोरी

अमेय व साजिरी हे दोघेही एकाच कॉलेजमधून शिक्षण घेत होते. अमेयला कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तो अनेक नाटकांमध्ये भाग घेत असे. अशातच एक दिवस साजिरी तिच्या मैत्रिणीसह अमेयचं एक नाटक पाहायला गेली असताना तिथे अमेयला पाहिल्यानंतर पहिल्या भेटीतच साजिरीला अमेय आवडला होता आणि तिने त्याला पहिल्या भेटीतच आपण डेटवर जायचं का? असं विचारलं होतं. पण, अमेयने मला अभिनयावर फोकस करायचा आहे असं म्हणत नकार दिला होता. परंतु, नंतर साजिरीनेच पुन्हा एकदा एक महिन्याच्या कालावधीनंतर कॉलेजमध्ये सर्वांसमोर अमेयला “आतातरी मला हो म्हण” असं म्हटलं होतं.

यानंतर पुढे अमेयनेच स्वतः गुलाबाचं फूल व ग्रीटिंग कार्ड देऊन साजिरीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. याबद्दलचा किस्सा अमेय व साजिरी यांनी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात सांगितला आहे. पुढे २ जुलै २०१७ साली अमेय व साजिरी यांनी एकमेकांसह लग्न केलं; तर आता या दोघांच्या लग्नाला जवळपास आठ वर्ष होत आली आहेत.

दरम्यान, अमेयचं नुकतंच छोट्या पडद्यावर पुनरागमन झालं असून तो ‘स्टारप्रवाह’ वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अमेय तब्बल आठ वर्षांनी सूत्रसंचालन करत असल्याचं त्याने सांगितलं आहे. या कार्यक्रमात अमेयसह मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळत आहेत; तर अमेय नुकताच ‘लाईक आणि सबस्क्राईब’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटांत झळकला होता.