अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अमेय त्याच्या मिश्कील स्वभावासाठी ओळखला जातो. अभिनयाच्या बाबतीत अमेय निवडक भूमिका साकारताना दिसतो. त्यामुळे त्याने आजवर साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. परंतु, फक्त पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही अमेय त्याच्या सर्व भूमिका उत्तमरीत्या पार पाडताना दिसतो.
अमेय वाघ सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्यामार्फत तो अनेकदा त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलच्या अपडेट्स चाहत्यांसह शेअर करीत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अमेय नेहमीच सोशल मीडियामार्फत त्याच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना त्याच्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. अशातच अमेयने १३ मे रोजी त्याच्या सख्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर बहिणीबरोबरचा फोटो पोस्ट करीत त्याने अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या.
अमेयने या फोटोला ‘जागतिक घोरणे स्पर्धेच्या विजेत्या, सर्वोत्तम घरगडी चॅम्पियनशिप विजेत्या, मोठ्या भावाशी भांडीन; पण थकणार नाही हा बाणा असलेल्या, केरळ – महाराष्ट्र स्वयंपाक कराराच्या सचिव स्मिता वाघ’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यासह अमेयने याच दिवशी त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचेही सांगितले आहे. यावेळी त्याने आई-वडील, बहीण यांचे फोटो पोस्ट केले आहेत.
अमेयच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचं झाले, तर अमेयचे आई-बाबा, बहीण व बायको असे कुटुंब आहे. त्याची बहीण लग्नानंतर केरळमध्ये स्थायिक झाली आहे आणि अमेयचे आई-बाबा हे पुण्यात राहत असल्याचे त्याने म्हटले होते. अमेय मूळचा पुण्याचा असून, तो कामामुळे त्याची पत्नी साजिरीसह मुंबईत स्थायिक झाला आहे.
दरम्यान, अमेय वाघचे नुकतेच टेलिव्हिजनवर पुनरागमन झाले असून, सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासह यामध्ये मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.