Anupamaa set destroyed in massive fire : अभिनेत्री रूपाली गांगुली यांची मुख्य भूमिका असलेली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अनुपमा’. त्यात येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे मालिका कायम चर्चेत येत असते. अशातच या मालिकेबद्दल एक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला आग लागली आहे. या आगीमुळे मालिकेच्या सेटचं नुकसान झालं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार सोमवारी (२३ जून) सकाळी ७ वाजता मालिकेचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी सेटला आग लागली. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, ही घटना घडली तेव्हा मालिकेत काम करणारे काही क्रू मेंबर्स सेटवर उपस्थित होते. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) सोशल मीडियावर या संदर्भाची माहिती दिली आहे.

सेटवरील आगीच्या घटनेनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी ‘स्क्रीन’शी संवाद साधताना मालिकेचे निर्माते राजन शाही यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सुरेश गुप्ता म्हणाले, “फिल्मसिटीतील ‘अनुपमा’च्या सेटवर भीषण आग लागली. आग लागल्याच्या एक तासानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण सेट लाकडाचा होता आणि त्याच्याभोवती असलेले इतर सेटसुद्धा लाकडाचे होते. निर्माते व प्रॉडक्शन हाऊस पैसे वाचवण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांचे पालन करीत नव्हते आणि त्यामुळे सेटला आग लागली”.

सुरेश गुप्ता पुढे म्हणाले, “दरवर्षी हे लोक हजारो कामगारांचे जीव धोक्यात घालतात. कामगारांकडे दुसरा पर्याय नसल्याने ते काम करत असतात. फिल्मसिटीचे एमडी किंवा इतर कोणताही अधिकारी कधीही सेटवरील अग्निसुरक्षेसंबंधित तपासणी करण्याची तसदी घेत नाही. एआयसीडब्ल्यूए (AICWA) अध्यक्ष या नात्याने, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि यात कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे तपासण्याची मागणी करतो”.

या मालिकेच्या जवळच्या एका सूत्रानेही आगीच्या आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सेटवर कोणीही नसताना ही घटना घडल्याचेही सूत्राने सांगितले. मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, ‘अनुपमा’च्या सेटवर गेल्या वर्षी एका ३२ वर्षीय क्रू मेंबरला विजेचा धक्का बसला होता. नंतर निर्मात्यांनी असा दावा केला होता की, तो कॅमेरा अटेंडंट होता आणि ज्याने बूट घातले नसताना चुकून लाईट रॉड आणि कॅमेरा दोन्ही एकत्र उचलले होते.

सेटवर उपस्थित असलेल्या डीओपीने सांगितले होते की, ही पूर्णपणे त्याची चूक होती. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली; परंतु दुर्दैवाने आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. हे खूप दुःखद होते.