Bhau Kadam Daughter Shares Video : अलीकडे सोशल मीडियावर एखादी वाईट किंवा चुकीची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरते आणि नकळत काही जणांकडून या चुकीच्या बातमीवर विश्वासही ठेवला जातो. त्यात कलाकार मंडळींबद्दलच्या अनेक चुकीच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकजण सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत कलाकारांबद्दलच्या अफवा पसरवतात. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम यांच्या निधनाबद्दलचा एक फेक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
भाऊ कदम यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची माहिती भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिने दिली आहे. मृण्मयीने याबद्दलचा सविस्तर व्हिडीओ स्वत:च्या युट्यूब चॅनलद्वारे शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओमधून तिने याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
या व्हिडीओमध्ये मृण्मयी असं म्हणते, “आज सकाळी मला समजलं की, एका व्यक्तीने ‘भाऊ कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. खरंतर खूपच वाईट प्रवृत्तीची आणि मानसिकदृष्ट्या कमजोर असलेली व्यक्तीच हे असे व्हिडीओ बनवू शकते. या अशा व्यक्ती भावनाशून्य असतात. मी मान्य करते की, अशा व्यक्तींना भावना नसतात किंवा केवळ व्ह्यूजसाठी तुम्ही असं काहीही करता आणि यासाठी तुम्ही अक्षरश: कोणत्याही पातळीला जाऊ शकता.”
यानंतर ती म्हणते, “मी सकाळीच उठले आणि मला याबद्दल कळलं तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या वडिलांनाही सतत फोन येत होते. तेव्हा मला वाटलं की, याबद्दल मला माझ्या युट्यूब चॅनेलद्वारे बोलणं गरजेचं आहे. कारण केवळ प्रसिद्धी आणि व्ह्यूजसाठी असे व्हिडीओ बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. सकाळपासून मी याबद्दल अनेक गोष्टी बघत आहे आणि मी याबद्दल कायदेशीर पाऊलही उचलणार आहे. कारण संबंधित व्यक्तीला शिक्षा होणं गरजेचं आहे.”
यापुढे मृण्मयी म्हणते, “स्वत:च्या वडिलांबद्दल हे असं ऐकणं कोणी मनातही आणू शकत नाही. वडील तर सोडाच, पण आपण आपल्या दुश्मनाबद्दलही हे असं वाईट ऐकू शकत नाही. पण काही लोकांनी हे करून दाखवलं आहे. अशा चुकीच्या बातम्या पसरवून, लोकांचं लक्ष वेधून, यातून पैसे कमावणे आणि यामुळे यश मिळवणं हे कधीही पचणार नाही. याकडे दुर्लक्ष करणं अगदीच सोपं होतं. असं मला अनेकांनी सांगितलंही, पण माझ्यासाठी हा दुर्लक्ष करण्याचा मुद्दा नाही.”
यानंतर मृण्मयी सांगते, “आज हे माझ्या वडिलांबरोबर करण्यात आलं आहे आणि याबद्दल मी बोलली नाही तर सगळेच याकडे दुर्लक्ष करतील. ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नाही. मी हे मान्य करते की, मी माझे वडील या क्षेत्रात आहेत किंवा मीसुद्धा या इंडस्ट्रीत आहे. त्यामुळे काहीतरी चर्चा होणं, अफवा पसरणं, चुकीची माहिती छापून येणं हे होतंच असतं. पण थेट निधनाबद्दल व्हिडीओ बनवणं आणि त्यातून लोकांना आकर्षित करणं हे खूपच चूक आहे.”
यानंतर ती म्हणाली, “एक मुलगी म्हणून मी हे मान्य करू शकत नाही आणि मी मान्य करणारच नाही. कारण अनेक लोक या व्हिडीओवर विश्वास ठेवू शकतात. हा जोक नाही. जीवंत असणाऱ्या व्यक्तीला तो या जगात नसल्याचं सांगणं हे खूपच चूक आहे आणि ते अजिबातच सहन केलं जाणार नाही. ज्या व्यक्तीला आई-वडिलांनी जन्म दिला आहे, त्याच व्यक्तीला आपल्या आई-वडिलांबद्दल ही अशी बातमी ऐकणं सहन होईल का? मी तरी हे सहन करू शकत नाही.”
पुढे मृण्मयी असं म्हणते, “स्वत:च्या युट्यूब चॅनलला एखाद्या मीडिया हाऊसचं नाव देऊन तुम्ही हे असे प्रकार करत असाल तर हे चूक आहे आणि यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की, व्ह्यूज मिळाले असतील तर ते व्ह्यूज मी देत आहे. कारण मी तो व्हिडीओ शेअर केला आहे. हे युट्यूब चॅनल मला रिपोर्ट करायचं आहे. मी तो व्हिडीओ अजून बघितला नाही. पण याबद्दल मी माझ्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यासाठी मी माझ्या मंडळींना धन्यवाद म्हणेन की, त्यांनी त्या युट्यूब चॅनेलला रिपोर्ट केलं आहे.”
यानंतर मृण्मयीने सांगितलं, “याविरुद्ध कारवाई तर केली जाणारच आहे; त्याची सगळी प्रक्रियाही सुरू आहे. आशा आहे की, तो व्यक्ती समोर येईल. तो व्यक्ती हा व्हिडीओ बघत असेल तर एकच सांगते, चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न कर आणि अशा चुकीच्या गोष्टी करू काहीही फायदा होणार नाही. यामुळे फक्त नुकसानच होणार आहे. यातून सुधारण्यासाठी एकच सांगेन की, तुला प्रसिद्धी हवी आहे, त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ नको.”