Bigg Boss 16 Archana Gautam Opens New Cafe : मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आता अभिनयासह उद्योग क्षेत्रातही पाऊल टाकत आहेत. मराठीसह हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उद्योग क्षेत्रात आपली नवी सुरुवात केली आहे. कोणी स्वत:चा साड्यांचा ब्रँड, कुणी दागिन्यांचा ब्रँड, कुणी स्वत:चं सेलॉन सुरू केलं, तर कुणी स्वत:चं हॉटेल.
अशातच आता यात आणखी एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीची भर पडली आहे, ही अभिनेत्री म्हणजे अर्चना गौतम. बिग बॉस १६ आणि ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अर्चना गौतम आता बिझनेसवूमन झाली आहे. अभिनेत्रीने नुकतंच स्वत:चा कॅफे सुरू केला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तिनं आपल्या या नवीन कॅफेची सुरुवात केली आहे.
अर्चनानं सुरू केलेल्या या नवीन कॅफेचं उद्घाटन ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते पार पडलं. याचे काही खास फोटो अर्चनानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केले आहेत. तसंच अर्चनानं उषा नाडकर्णींचे आभारही मानले आहेत. अर्चना म्हणते, “जे लोक आपले असतात, ते नेहमीच आपल्याशी मनानं जोडलेले राहतात. उषा नाडकर्णी तुमचे मनःपूर्वक आभार. दिवाळीच्या शुभप्रसंगी Oye Churros कॅफेचे उद्घाटन तुमच्या हातून झालं ही आमच्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. या नव्या प्रवासासाठी तुमचे आशीर्वाद मिळणं, ही खूप सुंदर सुरुवात आहे.”
अर्चना गौतमच्या कॅफेचं उषा नाडकर्णींनी केलं उद्घाटन
अर्चनानं शेअर केलेल्या या नव्या कॅफेच्या फोटोंवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे तिचं कौतुक केलं आहे. तसंच तिच्या या नव्या सुरुवातीसाठी तिला खास शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, बिझनेसवूमन झालेली अर्चना ही सध्याच्या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१५ मध्ये आलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या बॉलीवूड चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. यानंतर तिनं ‘हसीना पारकर’ आणि ‘बारात कंपनी’सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
चित्रपटांबरोबरच अर्चना ‘साथ निभाना साथिया’ आणि ‘ये है आशिकी’सारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. मालिका आणि चित्रपटानंतर तिनं आपला मोर्चा रिअॅलिटी शोकडे वळवला. ती ‘बिग बॉस १६’मध्ये सहभागी झाली होती आणि नंतर ‘खतरों के खिलाडी’मध्येही ती दिसली. शिवाय नुकताच तिनं ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शोदेखीला केला. यानंतर आता अर्चनाने व्यवसाय क्षेत्रात आपली नवीन सुरुवात केली आहे. तिनं स्वत:चा कॅफे सुरू केला आहे.
