Bigg Boss 19 Amaal Malik Father Apologize : ‘बिग बॉस १९’च्या या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ खूपच चर्चेचा ठरला. या भागात सलमान खानने घरातल्या काही सदस्यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल फटकारलं. अमाल मलिक आणि आवेज दरबार यांच्यात झालेल्या भांडणाबद्दलही सलमानने त्याची तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
भांडणात अमालने आवेजवर वैयक्तिक टीका केली होती. याबद्दल सलमानने अमालला फटकारत सांगितलं की, “तुझ्या टीकेमुळे वडील डब्बू मलिक यांना आवेजचे वडील इस्माईल दरबार यांची माफी मागावी लागली आहे. अमालने आवेजवर केलेल्या टीकेनंतर अमालचे वडील डब्बू मलिक यांनी माफी मागितली.
Telly Masala ला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणतात, “आवेज आणि जैद दोघंही माझी प्रिय मुलं आहेत. त्यांनी मेहनतीने आपलं नाव कमावलं आहे, अगदी माझ्या मुलांप्रमाणे – अमाल आणि अरमान यांनीही तितकीच मेहनत केली आहे.”
यापुढे ते म्हणतात, “मी इस्माईलजींचा मोठा चाहता आहे, त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. माझ्या मुलाकडून काही चूक झाली असल्यास त्याला माफ करा. शोमध्ये वैयक्तिक गोष्टींचा फारच हस्तक्षेप होतोय, हे योग्य नाही. तरीही जर कुणाला वाईट वाटलं असेल तर त्याला समजून घ्या, माफ करा.”
नेमकं प्रकरण काय आहे?
अमाल मलिकने झीशानशी बोलताना म्हटलं होतं की, तो आवेज आणि नग्माला चांगलंच ओळखतो. ते त्याच्या गाण्यांचा वापर करून रील्स बनवतात आणि त्यातून कमाई करतात, त्यामुळे अमालने अप्रत्यक्षपणे “आवेज माझ्या गाण्यांवरून पैसे कमावतो” असा आरोप केला होता. यानंतर वाद वाढला आणि अमालने आवेजवर थेट टीका केली. यावर इस्माईल दरबार यांनी एका मुलाखतीत तीव्र प्रतिक्रिया दिली.
इस्माईल दरबार म्हणाले, “डब्बू मलिक स्वतः काही करू शकला नाही, त्यामुळे त्याने आपल्या मुलांना म्हणजे अमाल आणि अरमान यांना घेऊन सलमान खानच्या मदतीने पुढे आणलं. पण हा तर सलमान खानचा मोठेपणा आहे की, त्याने त्यांना संधी दिली. पण, आवेज दरबारने मात्र कोणाचीच मदत घेतली नाही. तो स्वतःच्या हिमतीवर पुढे आलाय. अमालला जर वाटत असेल की आवेज लोकप्रिय झाला आहे, तर तसं नाही. उलट, अमालच्या गाण्यांना लोकांपर्यंत पोचवायला त्याला आवेजसारख्या इन्फ्लुएन्सरची गरज आहे.”
दरम्यान, ‘बिग बॉस १९’ मधील अमाल आणि आवेज यांच्या भांडणामुळे वाद निर्माण झाले असून, हे वाद आता शोच्या बाहेरही पोहोचले आहेत. डब्बू मलिक आणि इस्माईल दरबार यांच्यातील सुसंवादाने काही प्रमाणात तणाव कमी झाला असला तरी अमालच्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा मात्र वाढली आहे.