Nikki Tamboli Talk About Qurbani Videos on Social Media : ‘बिग बॉस मराठी ५’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. निक्की तांबोळी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते. अशातच तिने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर व्हिगन झाल्याची पोस्ट शेअर केली होती. आता यावर निक्कीने नुकत्याच एका मुलाखतीत सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिगन होण्याबद्दल निक्की असं म्हणाली, “ईदच्या दिवशी मी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला. मी याआधी अनेकदा चिकन खाल्लं आहे. मटण कधीतरी खाल्लं होतं; पण मी माझ्या आयुष्यात मांसाहार केल्याचा मला आता पश्चात्ताप होत आहे. ईदच्या दिवशी व्हिगन होण्याचं तसं काही ठरवलं नव्हतं; पण मी गेले काही दिवस शाकाहारी होण्याचा विचार करतच होते.”
फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत निक्की असं म्हणाली, “कुर्बानी देणं ठीक आहे. मी त्याविरुद्ध नाही. मी तुमच्या संस्कृतीच्या विरोधातही नाही. पण, कुर्बानीशी संबंधित फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या मी विरोधात आहे. कारण- ते व्हिडीओ बघून भावनिक त्रास होतो. तुमचा धर्म काय करायला सांगतो, याबद्दल मला काही फरक पडत नाही. मी याबद्दल कोणतीच टीका करणार नाही किंवा मला त्यात पडायचंही नाही. पण तुम्ही त्या प्राण्यांना कापतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट कराल तर हे बघायला नको वाटतं आणि मी ते ईदच्या दिवशी पाहिलं.”
त्यानंतर ती म्हणते, “अनेकांनी धर्माच्या नावाखाली कुर्बानीचे व्हिडीओ पोस्ट केले होते. कुर्बानी देणं मी मान्य करते आणि तुमची संस्कृती म्हणून मी त्याचा आदरदेखील करते. पण, तुम्ही व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करणं हे चूक आहे. तुमची संस्कृती म्हणून हे करणं मान्य आहे; पण त्याचे व्हिडीओ सोशल मीडियवर पोस्ट करायला देवानं नाही सांगितलं.”
पुढे निक्की म्हणाली, “मला ते व्हिडीओ बघून खूपच वाईट वाटलं. त्यामुळे मी आणि माझी आई आम्ही दोघीही रडलो. मी याआधी अनेकदा मांस खाल्लं आहे; पण त्या प्राण्यांच्या वेदना मी कधी माझ्या डोळ्यांनी बघितल्या नाहीत. माझ्या भुकेसाठी एखाद्या प्राण्याला कापलं जात असताना बघून मला जाणवलं की, आता हे नको खाऊयात. याआधी खाल्लं… जे झालं ते झालं… पण आता नको… आपण आपल्यासाठी बदल करूयात.”
पुढे निक्की म्हणाली, “मी माझं पोट भरण्यासाठी कोणत्या प्राण्याचा जीव घेऊ नये आणि ही माझी इच्छा आहे. त्याबद्दल माझा कोणाला विरोध नाही किंवा माझ्यासमोर जरी कोणी मांसाहार केला तर ती त्याची इच्छा असेल. मी त्याबद्दल कोणावर टीका करू इच्छित नाही; पण मी स्वत:मध्ये बदल करू शकते. त्यामुळे ईदच्या दिवशी मी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आणि ईदनिमित्त स्वत:ला खास गिफ्ट दिलं.”