Dhananjay Powar Shares Post : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणजे डीपी दादा अर्थात धनंजय पोवार. धनंजय पोवार सोशल मीडियावर डीपी दादा म्हणून आधीच लोकप्रिय होता. तो पत्नी आणि आईबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असे.
नंतर ‘बिग बॉस मराठी’सारख्या शोमध्ये आल्यावर त्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत आणखीनच वाढ झाली. या घरातही त्यानं आपल्या विनोदी स्वभावाने घरातल्या स्पर्धकांची तसंच महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली. डीपी सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतो. तसंच काही सद्यस्थितीबद्दलही आपली मतं व्यक्त करताना दिसतो.
धनंजयने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तो असं म्हणतो, “लोकांना काय बघायचं हे माहीत आहे, मग दाखवण्याऱ्याला पण काय दाखवायचं हे माहीतच असेल ना… मराठी माणसानेच चित्रपटसृष्टी निर्माण केली, ही गोष्ट आपल्याला अभिमान वाटण्यासारखीच आहे. पण, आज त्या मराठी कलाकारांना जगण्यासाठी झगडावं लागतंय, हे किती विचित्र आहे ना?”
यानंतर डीपी असं म्हणतो, “प्रेक्षक असो वा कलाकार, संघर्ष सर्वांनाच आहे. काम कमी आहे, संधी कमी आहेत आणि जे आहे त्यातही दम नाही. कित्येक वेळा भूमिका मिळाल्या, पण त्या केवळ स्क्रीन भरण्यासाठी होत्या, त्यात आत्मा नव्हता. मी विचारतो, अशी स्क्रिप्ट (संहिता) लिहितात तरी कशी? मग वाटतं, कथा लिहायची असेल तर ती माणसांच्या हृदयातून यायला हवी, त्यांच्या आयुष्याला स्पर्श करणारी असावी.”
यानंतर त्याने म्हटलंय, “लोकांना हसवणं, रडवणं आणि विचार करायला लावणं हेच तर खरं सिनेमा करण्याचं ध्येय आहे.” यासह त्याने फॉलोअर्सनासुद्धा एक प्रश्न विचारला आहे; तो प्रश्न असा आहे की, “प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्यासाठी नेमकं काय हवं आहे?” दरम्यान, डीपी सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि विविध विषयांवर तो त्याची मतं मोकळेपणाने व्यक्त करतो. अशातच मराठी सिनेसृष्टीतील सिनेमांच्या परिस्थितीवर त्याने ही पोस्ट केली आहे.
‘बिग बॉस मराठी ५’नंतर प्रसिद्धीझोतात आलेला डीपी काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातसुद्धा दिसला होता. या शोमध्येही त्याचा मजेशीर स्वभाव प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला होता.