छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस हिंदीचा १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांना बिग बॉस १९ पाहता येईल. सलमान खानच्या शोमध्ये यंदा कोणते स्पर्धक असतील? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस १९ च्या घरात मराठी चेहरे दिसण्याची दाट शक्यता आहे.
बिग बॉस हिंदीतील स्पर्धक बिग बॉस मराठीत आणि बिग बॉस मराठीतील स्पर्धक हिंदीत दिसणं नवीन नाही. बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे बिग बॉस हिंदीत झळकला होता. तो उत्तम खेळत बिग बॉस हिंदीचा उपविजेता ठरला होता. तसेच बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व गाजवणारी निक्की तांबोळी आधी बिग बॉस हिंदीत सहभागी झाली होती. आता बिग बॉस मराठीतील एक सदस्य बिग बॉस हिंदीत दिसणार, अशी चर्चा होत आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सर्वांची मनं जिंकणारा सदस्य बिग बॉस हिंदी १९ मध्ये दिसणार, असं म्हटलं जातंय. हा सदस्य म्हणजे गायक अभिजीत सावंत होय. अभिजीतला चॅनलने बिग बॉस १९ साठी विचारणा केली आहे, असं म्हटलं जातंय. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरलेला अभिजीत बिग बॉस १९ ची ऑफर स्वीकारणार की नाही, हे लवकरच कळेल.
बिग बॉस हिंदीमध्ये दोन मराठी चेहरे झळकणार
अद्याप अभिजीत सावंत किंवा चॅनलने यासंदर्भात अधिकृत पुष्टी केलेली नाही. अभिजीतने ऑफर स्वीकारल्यास तो मराठी प्रेक्षकांना हिंदी स्पर्धकांबरोबर हा खेळ खेळताना दिसेल. याचबरोबर यंदा बिग बॉस हिंदीमध्ये दोन मराठी चेहरे घ्यायचे, असा प्रयत्न कलर्सकडून सुरू आहे. अभिजीतच्या नावाची चर्चा सुरू आहे, तरी दुसरा स्पर्धक कोण आहे, याबद्दल अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही.
आधी शिव ठाकरेने बिग बॉस हिंदीचे १६ वे पर्व गाजवले होते. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन १६ व्या स्पर्धकाचा विजेता ठरला होता, तर शिव उपविजेता ठरला होता. आता अभिजीतच्या नावाची चर्चा होत आहे, ते पाहता जर तो बिग बॉस हिंदीत झळकला तर ही मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. अभिजीत बिग बॉस हिंदीमध्ये दिसणार की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.