Dhananjay Powar & Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर ही भावा-बहिणीची जोडी महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शोमध्ये अंकिता धनंजयला ‘डीपी दादा’ म्हणायची. आता ‘बिग बॉस’ संपून अनेक महिने उलटून गेल्यावरही या दोघांची मैत्री कायम आहे. मात्र, डीपीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
धनंजय पोवारने नुकतीच बहिणीला उद्देशून एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यामध्ये, “काही कारणास्तव भावा-बहिणीच्या नात्यात अबोला आला होता पण, तू कायम माझी बहीण आहेस आणि राहशील” असं डीपीने लिहिलं होतं. मात्र, या पोस्टमध्ये सुरुवातीला धनंजयने कोणाचाही उल्लेख केला नव्हता. ही पोस्ट वाचून दोघेही काही दिवस एकमेकांच्या संपर्कात नव्हते असा मथितार्थ निघत होता.
धनंजयच्या याच पोस्टचा स्क्रीनशॉट स्टोरीवर शेअर करत, “नाव लिहून बोला ना मला… नुसत्या स्टोऱ्या काय ठेवताय…” असं अंकिताने म्हटलं. यानंतर काही वेळाने धनंजयने पुन्हा सेम पोस्ट रिशेअर करत याखाली, “अंकिता प्रभूवालावलकर तुमच्यासाठी आहे” असं नमूद केलं. ही पोस्ट नेमकी काय होती? आणि यावरून एवढी चर्चा का रंगलीये पाहुयात…
धनंजय पोवारची पोस्ट
काही दिवसांचा हा अबोला,
वर्षानुवर्षे सरल्यासारखं वाटतं…
नाहीतर तूच ती होतीस,
जिच्याशी मी माझं लपवलेलं दुःख वाटायचोरुसवे-फुगवे, भांडणं क्षणभंगुर होती,
तुझं ‘दादा’ म्हणणं माझं विश्व होतं…
आज तुझ्या त्या हाकेची जागा
मौनाने घेतली आहे – फार कठीण वाटतं.कधीकाळी एकमेकांशिवाय अर्धही नसलं,
आज दोघेही पूर्ण असूनही अधुरं काहीसं वाटतं.
त्या जुन्या फोटोंमध्ये हसणं दिसतं,
पण आतून मात्र… खूप काही हरवतं.कदाचित चूक कुणाचीच नव्हती,
पण ईगो दोघांचाही थोडा मोठा झाला…शब्द अपुरे ठरतात – पण भावना सांगतेय,
तू बहिण आहेस… आणि कायमच राहशील.अंकिता प्रभूवालावलकर तुमच्यासाठी आहे…
दरम्यान, ही पोस्ट वाचून धनंजय आणि अंकितामध्ये अबोला निर्माण झाला होता का? या संभ्रमात चाहते पडले आहेत. या दोघांचं बॉण्डिंग ‘बिग बॉस’ पासून चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. याशिवाय अंकिताच्या लग्नात डीपी दादाने तिच्या मोठ्या भावाच्या नात्याने कुणालचा कान देखील पिळला होता. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर धनंजय पोवार ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात झळकत आहे. तर अंकिता नुकतीच नवऱ्यासह पंढरीच्या वारीत सहभागी झाली होती.