बिग बॉसमध्ये वाद, रुसवे-फुगवे, प्रेमप्रकरण अशा गोष्टी सहज पाहायला मिळतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेमध्ये वरच्या स्थानावर आहे. चाहते दररोज हा कार्यक्रम आवडीने पाहतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी महेश मांजरेकर यांची चावडी असते. घरातील सदस्य इतर सदस्यांना नॉमिनेट करतात. पुढे नॉमिनेट केलेल्या सदस्यांपैकी सर्वात कमी मत मिळालेला सदस्य घरातून बाहेर पडतो. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे यांच्यानंतर ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वातून रुचिरा जाधव बाहेर पडली.

या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले. मागच्या आठवड्यात त्यांच्यात वाद देखील झाला. अशातच रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यामधला वाद आणखी चिघळला. कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने एकूण प्रकरणावर भाष्य केले.

आणखी वाचा – ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याने सुनील शेंडे यांना वाहिली श्रद्धांजली; पोस्ट शेअर करत म्हणाले…

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “रोहितचं त्यांच्याशी (टीम A) खूप जमायचं. माझं जेवढ्यास तेवढं होतं. स्वार्थासाठी मी नाती बनवू शकत नाही. माझं जेवढं आहे, तेवढं टिकवण्याचा प्रयत्न मी करते. मला रोहितचा गेम कधी कळला नाही. मी खूपदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी १ अधिक १ मध्ये अडकले. जर मी एकटी खेळले असते, तर कदाचित गोष्ट वेगळी असती.” पुढे तिला “गेल्या काही दिवसांमध्ये तुझ्यात आणि रोहितमध्ये वादाचे प्रसंग पाहायला मिळाले. काल जाताना त्याला मिठी मारायलाही तू नकार देत होतास. तुझ्या जाण्याने त्याला फरक पडला नाही असं तुला वाटतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा – Salaam Venky Trailer : आजारी लेक, मृत्यूशी झुंज अन्…; काजोलच्या ‘सलाम वेंकी’चा ट्रेलर प्रदर्शित, आमिर खानचीही दिसली झलक

त्यावर रुचिरा म्हणाली, “मी जाणार नाही असं त्याला वाटलं असावं. नात्यामध्ये समोरच्याला गृहीत धरायचं नाही. माझा स्वभाव आहे की, मी एखाद्यावर प्रेम केलं तर मी स्वत:ला विसरून करते. शोमधला त्याचा वेगळा खेळ होता. मी त्याला नेहमी ‘जोपर्यंत मला तुझ्या खेळाचा त्रास होत नाही, तोपर्यंत मी तुझ्या खेळाची आदर करत राहीन’, असं सांगायचे. आता चित्र तुमच्यासमोर आहे, त्याच्या खेळाचा माझ्यावर परिणाम झालाय.”