Gopichand Padalkar and Jitendra Awhad Fight : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत आज (१७ जुलै) विधिमंडळात हाणामारीची घटना घडली आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विधानभवनाच्या पायऱ्यावर हा प्रकार घडला.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मागील दोन दिवसांपासून शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर विधिमंडळात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली. हा हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विधिमंडळातील या हाणामारीबद्दल आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राजकीय क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मराठी अभिनेता सुव्रत जोशीने पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्याने या घटनेबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, “आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरून अत्यंत परिपक्वरित्या विधानसभेत लोकशाही पद्धतीने ‘विचारविनिमय’ केलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन”. सुव्रत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.
सुव्रत जोशी सोशल मीडियावरद्वारे अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्याची मतं मोकळेपणाने व्यक्त करत असतो. अशातच त्याने विधिमंडळातील हाणामारीबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, सुव्रतबद्दल बोलायचं झालं तर मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून सुव्रतने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या सुव्रत ‘वरवरचे वधू वर’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात त्याच्याबरोबर सखी गोखलेदेखील आहे. या नाटकाला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.