Shreya Bugde Shares Traffic Post : मुंबई आणि नजीकच्या शहरातली वाहतूक कोंडी आता काही नवीन राहिलेली नाही. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे आणि रस्त्यावरील खड्डे… यांमुळे तर वाहतूक कोंडीची समस्या आणखीनच भीषण होत चालली आहे.
सामान्य नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो, तसाच त्रास अनेक कलाकार मंडळीदेखील सहन करतात. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार अशा दैनंदिन आयुष्यातील समस्यांबाबत सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करताना दिसतात. अशातच अभिनेत्री श्रेया बुगडे हिने या वाहतूक कोंडीच्या समस्येबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेली श्रेया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करते. तसेच तिच्या दैनंदिन आयुष्यातील काही अपडेट्सदेखील ती शेअर करताना दिसते.
अशातच श्रेयाने सोशल मीडियावर वाहतूक कोंडीबद्दलची मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. तब्बल पाच तास वाहतूक कोंडीत अडकल्याने या वेळात खाणे-पिणे किंवा पुस्तक वाचण्यासाठीची सोय व्हावी म्हणून दुकानं उभारली जावीत, असं मत तिनं व्यक्त केलं आहे. तसंच तिनं शौचालयाचा मुद्दाही उपस्थित केलाय.
इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे श्रेया असं म्हणते, “मुंबईतल्या वाहतूक कोंडीची परिस्थिती बघता, आता रस्त्यांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल, खरेदीसाठीची दुकानं, पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारले जावेत, जेणेकरून लोक वाहतूक कोंडीत अडकले असताना खाणे-पिणे, खरेदी करणे, वाचन करणे किंवा संगीत ऐकणे अशा गोष्टी करू शकतील. कृपया रस्त्यांवर सार्वजनिक शौचालयांचीही सोय करावी. पाच तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेला एक निराश आणि हतबल मुंबईकर…”
दरम्यान, श्रेयाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये तिच्यासह कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव व गौरव मोरे हे कलाकारही आहेत. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करीत आहे.