Chala Hawa Yeu Dya Fame Priyadarshan Jadhav : ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गँगवॉर’ हे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदा या कार्यक्रमाचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तसेच गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव यांची शोमध्ये नव्याने एन्ट्री झालेली आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या या नव्या पर्वात अभिनेता प्रियदर्शन जाधव तिहेरी जबाबदारी सांभाळताना दिसेल. याबद्दल जाणून घेऊयात…

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात अभिनेता प्रियदर्शन जाधव एक-दोन नाही तर तिहेरी भूमिकेत झळकणार आहे. या नव्या पर्वात अभिनयासह प्रियदर्शन लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही जबाबदारी सांभाळेल. चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हा बहुरंगी कलाकार आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

या पर्वात आम्ही एकटे नसणार

प्रियदर्शन याबद्दल सांगतो, “जेव्हा ‘फू बाई फू’ हा शो सुरू होता तेव्हापासूनच मी या टीमचा भाग होतो पण, काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता. मात्र, जेव्हा मला ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वासाठी विचारण्यात आलं तेव्हा खूप आनंद झाला. माझ्या करिअरमध्ये ‘झी मराठी’चा मोलाचा वाटा आहे. यंदा या शोच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी काही स्किट देखील लिहिणार आहे आणि अभिनय सुद्धा करणार आहे. अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणार कारण १० वर्षे या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलंय आणि आताही प्रेक्षकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

प्रियदर्शन पुढे म्हणाला, “या पर्वात आम्ही एकटे नसणार…आमच्याबरोबर असणार आहेत हास्य कलाकार जे महाराष्ट्राच्या विविध भागांतून या मंचावर आले आहेत. या शोचे अस्सल स्टार ते असणार आहेत. या पर्वात माझी तिहेरी भूमिका असणार आहे. मी दिग्दर्शनही पाहणार, स्पर्धकांचे स्किटही बघणार आणि परफॉर्मही करणार आहे. पण हे सगळं मी एकटा करणार नसून माझ्याबरोबर आणखी काही प्रतिभाशाली लेखक आणि दिग्दर्शक असणार आहेत.”

गौरव मोरेसह पहिल्यांदाच काम

“आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहोत. शूटचा पहिला दिवस धमाकेदार होता. भारत, श्रेया, कुशल, गौरवसह काम करताना खूप मजा आली. मी याआधी कुशलसह नाटकात काम केलंय, श्रेयाने माझ्या वेबसीरिजमध्ये काम केलंय, भारतनेही माझ्यासह नाटकात काम केलंय पण, गौरवबरोबर यापूर्वी काम करण्याचा योग आला नव्हता. आता या शोच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतोय. जेव्हा लोकांना समजलं की मी हा शो करतोय… तेव्हा अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी कॉल केले होते. प्रेक्षकांचं प्रेम पाहून खूप भारावून गेलोय आणि आता जबाबदारी देखील वाढलीये. आम्ही सगळे खूप मेहनत करत आहोत. मला खात्री आहे की या पर्वातून आम्ही तोच आनंद पुन्हा देऊ.”

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या- कॉमेडीच गँगवॉर’ हा शो २६ जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९:०० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.