Chala Hawa Yeu Dya New Season : ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने जवळपास १० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मार्च २०२४ मध्ये या कार्यक्रमाने काही काळासाठी छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. आता वर्षभराच्या ब्रेकनंतर हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात यंदा कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. यंदा या कार्यक्रमात प्रेक्षकांना धमाकेदार स्किट्स पाहायला मिळणार आहेत. याशिवाय काही लोकप्रिय सेलिब्रिटी सुद्धा यंदाच्या पर्वात उपस्थित राहतील. श्रेया बुगडे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे या कलाकारांची वर्णी ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात लागली आहे. हा नवीन सीझन २६ जुलैपासून सुरू होत आहे.

श्रेया, गौरव, प्रियदर्शन, कुशल, भारत हे सगळे कलाकार आता गँगलॉर्ड्सच्या भूमिकेतून नव्या कलाकारांना मार्गदर्शन करतील, त्यांना प्रशिक्षित करतील आणि एक धमाकेदार विनोदी टीम तयार करतील. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहे. त्याच्या उत्साही शैलीमुळे प्रत्येक भाग अधिक रंगतदार आणि मनोरंजक ठरणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या प्रत्येक भागात गँगलॉर्ड्स म्हणजेच पाच मेंटॉर्सचं एक विशेष विनोदी सादरीकरण होईल. यामुळेच प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रभरातून आलेले २५ विनोदी कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत.

या पर्वाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे योगेश शिरसाट यांनी… त्यांच्या सोबतीला नव्या दमाचे होतकरू लेखक अनिश गोरेगावकर, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, अक्षय जोशी, पूर्णानंद वांढेकर आणि अमोल पाटील हे लेखक असणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गँगवॉर’ हा कार्यक्रम नवा ताजेपणा देणारा आणि नव्या पिढीच्या विनोदी कलाकारांना मोठं व्यासपीठ देणारा एक अनोखा प्रयोग आहे.

‘चला हवा येऊ द्या’ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विनोदाची नवी लाट घेऊन येणार आहे. २६ जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.