Chhota Pudhari : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर प्रसिद्धी झोतात आले, त्यापैकी एक म्हणजे छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे. ‘बिग बॉस’च्या घरात त्याने आपल्या खेळीने अनेकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या चाहते वर्गात चांगलीच वाढ झाली. ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेला घन:श्याम सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याच्या एका व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

जान्हवी आणि घन:श्यामचा हटके डान्स व्हिडीओ

घन:श्यामने सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी किल्लेकरबरोबरचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांची चांगलीच मैत्री पाहायला मिळाली होती आणि ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतरही त्यांनी आपली मैत्री जपली आहे. ‘बिग बॉस’नंतर दोघांच्या भेटीही झाल्या. अशातच दोघे नुकतेच सूरज चव्हाणच्या आगामी ‘झापुक झुपूक’ चित्रपटातील ‘वाजीव दादा’ या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी भेटले होते. यावेळी घन:श्याम व जान्हवीने एका गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

घन:श्यामबरोबरच्या डान्सवर जान्हवीची कमेंट

घन:श्याम व जान्हवी यांनी ‘तुरू तुरू चालू नको’ या गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी डान्स करताना दिसत आहे, तर घन:श्यामही तिला साथ देताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ शेअर करत घन:श्यामने मिश्किलपणे “माझ्यावर विशेष लक्ष ठेवून असणाऱ्यांनी कमेंट करायला या लवकर” असं म्हटलं आहे आणि पुढे “तुमचेच आशीर्वाद आहेत” असंदेखील म्हटलं आहे. तर घन:श्यामच्या या डान्सवर जान्हवीनेही कमेंट केली आहे.

“या रीलनंतर सध्या माझी मानसिक अवस्था बरी नाही”

या डान्स व्हिडीओवर जान्हवीने “या रीलनंतर सध्या माझी मानसिक अवस्था बरी नाही” असं म्हटलं आहे. जान्हवीच्या या कमेंटवर एका नेटकऱ्याने “खरं आहे, तो पागल आहे. तुम्ही कशाला त्याच्याबरोबर रील करता” असं म्हटलं, यावर जान्हवी नेटकऱ्याला “फक्त मनोरंजनासाठी” असं उत्तर दिलं आहे. दरम्यान, घन:श्याम आणि जान्हवीच्या या डान्स रिलवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जान्हवी आणि घन:श्याम ‘वाजीव दादा’ गाण्यात एकत्र

‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी आणि घन:श्याममध्ये चांगली मैत्री झाली होती. अनेकदा टास्कदरम्यान त्यांच्यात खटकेदेखील उडाले होते. पण, ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली आहे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर जान्हवी-घन:श्याम दिवाळीनिमित्त भेटलेदेखील होते. अशातच आता ते पुन्हा एकदा सूरजच्या चित्रपटातील ‘वाजीव दादा’ गाण्यात एकत्र दिसणार आहेत.

जान्हवी आणि घन:श्यामच्या कामाबद्दल थोडक्यात

दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, जान्हवी किल्लेकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, तर घन:श्याम स्टार प्रवाहच्याच ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या २६ एप्रिलपासून हा शो शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.