मराठी दूरचित्रवाणीवरील पहिली दैनंदिन मालिका (Daily Soap) ठरलेली ‘दामिनी’, आता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘दामिनी २.०’ या सिक्वेलसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कै. गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकारी यांच्या “श्री अधिकारी ब्रदर्स” बॅनरखाली निर्मित आणि श्रीमती कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘दामिनी’ने ९ वर्षांच्या कालावधीत १५०० हून अधिक भाग पूर्ण करून ‘पंथ-प्रतिष्ठेचा’ बहुमान मिळवला होता.

दामिनी २.० चं लेखन दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं

‘दामिनी २.०’ ची निर्मिती दूरदर्शन सह्याद्री वाहिनी स्वतः करत आहे आणि तिचे लेखन व दिग्दर्शन श्रीमती कांचन अधिकारी या स्वतः करणार आहेत. भारतीय दूरचित्रवाणीवर तीन दशकांनंतर एक वारसा परत येत असताना, माध्यम सम्राट मार्कंड अधिकारी याबाबत म्हणाले, ​”दूरदर्शन केंद्र, मुंबईने ‘दामिनी २.०’ च्या निर्मितीद्वारे ‘दामिनी’ चा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला, आणि कांचन स्वतः त्याचे लेखन व दिग्दर्शन करत आहे, याचा मला खूप आनंद आहे.” दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने गेल्या सहा दशकांमध्ये भारतीय प्रेक्षकांसाठी उल्लेखनीय कंटेंटची निर्मिती केली आहे आणि आपल्या प्रेक्षकांमुळे या वाहिनीने घरोघरी आपले स्थान निर्माण केले आहे. ‘दामिनी’ ला जे यश आणि लोकप्रियता मिळाली, तीच ‘दामिनी २.०’ ला मिळो, ही माझी सदिच्छा!”

१९९७ मध्ये सुरु झाली होती दामिनी मालिका

१९९७ मध्ये दामिनी ही मालिका सुरु झाली होती. मालिकेचं टायटल साँग आणि प्रतीक्षा लोणकर यांची मध्यवर्ती भूमिका या दोन्ही गोष्टी तेव्हा सगळ्यांनाच भावल्या होत्या. या मालिकेचं गारुड पुढची १० ते १२ वर्षे कायम राहिलं. त्यानंतर आता १८ वर्षांनी दामिनी २.० अर्थात मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दामिनी २.० असंच या मालिकेचं नाव असणार आहे. सह्याद्री वाहिनीवर ही मालिका पाहता येईल.

किरण पावसे ही अभिनेत्री साकारणार दामिनी

किरण पावसे ही अभिनेत्री आता दामिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनीही एक विशेष व्हिडीओ पोस्ट करत किरणला नवी दामिनी साकारण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. किरणसह या मालिकेत क्षिती जोग, सुबोध भावे यांच्याही भूमिका असतील. तर ध्रुव दातार हा या मालिकेत मुख्य भूमिकेत असेल. नव्या मालिकेत काय असणार याची उत्सुकता कायम आहे.