Ganesh Chaturthi Special Devmanus Fame Kiran Gaikwad Shared A Post : गणेश चतुर्थीनिमित्त कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाडनेसुद्धा यानिमित्त नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

किरण गायकवाडसाठी यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण- लग्नानंतर तो पहिल्यांदाच सहपत्नीक गणेशोत्सव साजरा करीत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ रोजी किरण व वैष्णवी कल्याणकर यांनी लग्नगाठ बांधली आणि आज हे जोडपं त्यांच्या लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव एकत्र साजरा करीत आहे.

किरणनं त्यानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, यावेळी त्यानं त्याच्या बायकोबरोबरचे फोटोही शेअर केले आहेत. किरण व वैष्णवी यांनी लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबीयांसह साजर केल्याचं पोस्टमधून पाहायला मिळत आहे. किरणनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या घरातील बाप्पा पाहायला मिळत आहे. त्यासह त्याचं कुटुंबही गणेश चतुर्थीनिमित्त एकत्र जमल्याचं या फोटोंमधून दिसतं.

किरणनं गणेश चतुर्थीनिमित्त पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे; तर वैष्णवीनं सुंदर अशी मोरपिशी रंगाची साडी नेसली आहे. यावेळी ती पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं तयार झाली असून, दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. दोघांनी यावेळी गणपती बाप्पाबरोबर फोटो काढले आहेत

किरण व वैष्णवी यांनी त्यांच्या घरी बाप्पासाठी छान सुंदर व रेखीव आरास केल्याचं दिसतं. यावेळी बाप्पाच्या मागे फुलांची सजावट केली असून, त्याजवळ काही दिवे लावल्याचं दिसतं. गणेश चतुर्थीनिमित्त किरण सुट्टी टाकून, त्याच्या घरी आल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी त्यानं मालिकेच्या चित्रीकरणातून थोडा ब्रेक घेत, कुटुंबासह सण साजरा केल्याचं दिसतं.

दरम्यान, किरण गायकवाडची देवमाणूस ही मालिका सध्या विशेष चर्चेत आहे. नुकतीच त्यमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची एन्ट्री झाली आहे. तर, या मालिकेतून काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री एकता डांगरची एक्झिट झाल्याचं पाहायला मिळालं. मिलिंद शिंदे यांच्या एन्ट्रीनं मालिकेत नवीन वळण आलं असून, आता पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.