अभिनेत्री दिव्या पुगावकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘तिने मुलगी झाली हो’ या मालिकेतून मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. त्यामध्ये तिनं माऊची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिकंली. दिव्यानं काही दिवसांपूर्वीच तिचा प्रियकर अक्षय घरतसह लग्न केलं. दिव्या व अक्षय बरीच वर्षं एकमेकांना डेट करत होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये या जोडीनं लग्नगाठ बांधली.
दिव्या सध्या ‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ‘झी मराठी’नं नुकतंच आंबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ‘झी मराठी’वरील विविध मालिकांतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यान दिव्या व अभिनेता मेघन जाधव यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिव्यानं तिच्या सासू-सासऱ्यांबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “माझ्या सासरी जेव्हा माझ्या सासू व सासऱ्यांना कळलं की, मला आंबे खूप आवडतात तेव्हा त्यांनी माझ्यासाठी जवळपास ६०० आंबे खरेदी करून आणले आणि म्हणाले आता तुला काय आंबे खायचे आहेत ते खा. त्यासह दिव्या पुढे म्हणाली, माझ्या सासूबाई मला रोज डबा बनवून देतात. आणि आता आंब्यांचा सीझन असल्यानं त्या रोज डब्याबरोबर १-२ आंबे देतातच.”
‘झी मराठी’ आयोजित आंबा महोत्सव या कार्यक्रमाला वाहिनीवरील विविध मालिकांतील कलाकारांनी हजेरी लावली होती. हे सर्व कलाकार यावेळी खेळ खेळतानाही दिसले. यादरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील कालाकारही उपस्थित होते.
दरम्यान, दिव्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, व आता ‘लक्ष्मी निवास’ यांसारख्या मालिकेत काम करीत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासह दिव्या ‘विठ्ठला माझा सोबती’ या चित्रपटातही झळकली होती. त्यामध्ये तिच्यासह अभिनेता आशय कुलकर्णी, अरुण नलावडे, संदीप पाठक यांसारखे कलाकार झळकले होते.