Savita Prabhune on experience of working in TV: अभिनेत्री सविता प्रभुणे सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत काम करीत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली मिळत असल्याचे दिसत आहे.

अनेक वर्षांपासून त्या मराठी चित्रपट, मालिका, नाटक आणि हिंदी मालिकांमध्ये काम करीत आहेत. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. त्यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या या मालिकेतील सुलोचना ही भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडली होती. अर्चनाच्या आईच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

“मराठी प्रेक्षकांसाठी तर हा अतिशय चांगला काळ आहे”

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ओटीटी या माध्यमामुळे टेलिव्हिजनकडे दु्र्लक्ष होईल का, यावर वक्तव्य केले आहे. नुकतीच त्यांनी अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना टेलिव्हिजन या माध्यमासाठी आव्हानात्मक काळ आहे का? असे विचारण्यात आले. त्या म्हणाल्या, “मी अजूनही वर्तमानपत्र वाचते. जेव्हा वर्तमानपत्रात मी नाटकांच्या खूप जाहिराती आल्याचे पाहते तेव्हा प्रेक्षकांसाठी निवडीचा पर्याय असल्याचे पाहून मला आनंद होतो.”

“वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं सध्या सुरू आहेत. वेगवेगळ्या विषयांवरचे, अत्यंत अवघड विषयांवरचे सिनेमे सध्या येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, मराठी प्रेक्षकांसाठी तर हा अतिशय चांगला काळ आहे. त्याबरोबरच कलाकारांसाठीसुद्धा चांगला काळ आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारायला मिळतायत; मग ते दूरदर्शन, नाटक किंवा सिनेमा असो. सध्या इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते पाहून मी खूश आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “मला असं वाटतं की, टीव्ही कायम राहणार. कोणीही, काहीही म्हणो; मी खूप ऐकलं आहे की, ओटीटी व इतर गोष्टी आल्या आहेत. पण, अजूनही रेटिंग बघितलं, तर टीव्हीचं महत्व कमी झालेलं दिसत नाही. दुपारी ४ वाजल्यापासून, रात्री साडेनऊपर्यंत लोक सातत्यानं टीव्ही बघत असतात. त्यामुळे टीव्हीवरील सगळ्या चॅनेल्सचं रेटिंग चांगलं आहे.”

“मी अतिशय आनंदाने…”

सविता प्रभुणे असेही म्हणाल्या, “तुम्ही लोकांच्या घरात जाऊन मनोरंजन करीत आहात, तर लोक टीव्ही बघणारच. माझा टीव्हीवर पूर्ण विश्वास आहे. कारण- खूप वर्षं काम करूनही मला कंटाळा आलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे डेलीसोपमध्ये काम करूनही मला कंटाळा आलेला नाही.”

“मी अतिशय आनंदाने डेलीसोपमध्ये काम करते आणि मला ते आव्हानात्मकही वाटतं. कारण- कलाकाराला माहीत नसतं की, ते साकारत असलेलं पात्र पुढे काय करणार आहे. दर आठवड्याला पात्रामध्ये बदल होत असतात. पण, तरीही कलाकाराला अतिशय प्रामाणिकपणे पात्र व्यक्त करायचं असतं. लोकांना ते कळतं. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत एखादं पात्र योग्यरीत्या पोहोचवण्याची जबाबदारी चॅनेल आणि कलाकार म्हणून आमचीसुद्धा असते.”