Marathi Singer Shares Pregnancy Post :’इंडियन आयडल’ या गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोमुळे अनेक गायक मंडळी प्रसिद्धीझोतात आली. या शोमुळे त्यांना आपली कला सादर करण्याचं नवं माध्यम मिळालं आणि ते आपली कला प्रेक्षकांसमोर आणू शकले. यापैकीच एक लोकप्रिय गायिका म्हणजे सायली कांबळे.

‘इंडियन आयडल’च्या १२ व्या सीझनमध्ये आपल्या सुमधुर आवाजाने देशभरातील प्रेक्षकांचं मन जिंकणारी मराठमोळी गायिका म्हणजे सायली कांबळे. एकाहून एक गाणी सादर करत तिने आपल्या रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या गायनाने चर्चेत येणारी सायली सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

सोशल मीडियाद्वारे सायली तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे सायली लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने खास पोस्ट शेअर करीत आई होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे.

सायलीचं डोहाळे जेवण नुकतंच पार पडलं असून या डोहाळे जेवणाच्या सोहळ्यातील खास फोटो शेअर करत तिने आई होणार असल्याची बातमी सांगितली आहे. सायलीने डोहाळे जेवणाच्या सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. हिरवी साडी, त्यावर डिझाईनर ब्लाऊज आणि फुलांचे दागिने असा खास लुक सायलीने केला होता.

सायलीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासह पती धवलही आहे. एकमेकांकडे आनंदाने पाहत असल्याचा खास क्षण त्यांनी शेअर केला आहे. तसंच या फोटोबरोबर त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी आई-बाबा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

या पोस्टमध्ये सायली म्हणते, “मी आणि धवल एक सुंदर बातमी तुमच्याबरोबर शेअर करत आहोत – आमच्या आयुष्यात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. आमच्या आयुष्याच्या या खास प्रवासाला सुरुवात झाली असून, आम्ही आमच्या बाळाला भेटण्यासाठी खूपच आतुर आहोत. आता आमच्या आयुष्यात त्याच्या रुपानं खूप सारं प्रेम येणार आहे, त्यामुळे आमचं मन आनंद आणि उत्सुकतेने भरून आलं आहे.”

सायली कांबळे इन्स्टाग्राम पोस्ट

सायली-धवलने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘इंडियन आयडल’मधील गायक मित्र-मैत्रिणींनी सायलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच सायलीच्या अनेक चाहत्यांकडून शुभेच्छा अन् कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

दरम्यान, २४ एप्रिल २०२२ रोजी सायलीने प्रियकर धवलबरोबर लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या तीन वर्षांनी दोघांनी आई-बाबा होणार असल्याची खूशखबर दिली आहे.