‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्याचा नुकताच भीषण अपघात झाला आहे. त्याने स्वतः त्याच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या अपघातग्रस्त कारचे फोटो समोर आले आहे आणि त्यात कारचा पुढील भाग चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे. रवी भाटिया असं या अभिनेत्याचं नाव आहे. त्याने ‘जोधा अकबर’ मध्ये सलीमची भूमिका करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रवीच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहते काळजी व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘जोधा अकबर’ने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं. प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ‘जोधा अकबर’ मालिकेतील प्रत्येक पात्र आणि ते कलाकार आजही लोकांच्या मनात घर करून आहे. शोमध्ये राजकुमार सलीमची भूमिका साकारणारा रवी भाटिया (Ravi Bhatia car accident) सध्या चर्चेत आला आहे. कारण त्याचा एक भयंकर अपघात झाला, ज्यामध्ये तो थोडक्यात बचावला आहे. रवीला किरकोळ जखमा झाल्या आहेत आणि तो अपघातातून सावरत आहे. रवीने एका मुलाखतीत त्याच्या अपघाताबद्दल सांगितलं.

रवी भाटियाने ई-टाइम्सशी बोलताना अपघाताबद्दल सविस्तर माहिती दिली. “आम्ही अक्सा बीचवर जात होतो, तेव्हा माझी कार टेम्पोला धडकली. याआधी माझी कार दोनदा भिंतीला धडकली होती. तेव्हा संध्याकाळचे साडेचार वाजले होते. या वळणावर अनेकदा अपघात होत असतात, असं तिथे उपस्थित असलेल्या जवानाने सांगितलं,” असं रवी भाटिया म्हणाला. एअरबॅग्जमुळे कारमधील सर्वांचे जीव वाचले, टाटाच्या कारमधील सेफ्टी फीचर्ससाठी त्याने रतन टाटांचे आभारही मानले.

अपघातातून सावरतोय रवी

रवी भाटियाच्या कारचं अपघातात खूप नुकसान झालं आहे, पण सुदैवाने तो बचावला आहे. त्याला जखमा झाल्या आहेत. “मला दुखापत झाली आहे, काही जखमा झाल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी भाजलोय. पण आता त्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र कारचे खूप नुकसान झाले आहे,” असं रवीने नमूद केलं.

पोलिसांनी केली मदत

अपघाताविषयी बोलताना रवी भाटिया म्हणाला की त्याने मृत्यूला खूप जवळून पाहिलं आहे. तसंच, अपघातानंतर आयुष्यात कसलीच शाश्वती नसल्याची जाणीव झाली, असंही त्याने नमूद केलं. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मुंबई पोलिसांनी त्याला मदत केली आणि त्याची गाडीही तिथून हटवली.

३६ वर्षीय रवी भाटिया हा लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्याने ‘लाल इश्क’, ‘इश्क सुभानल्लाह’, ‘हसरतें’, ‘हमारी बेटी राज करेगी’, ‘चिट्ठी’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’ आणि ‘सीआयडी’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jodha akbar fame actor ravi bhatia accident aksa beach mumbai car damaged photos videos viral hrc