Tharla Tar Mag Fame Disha Dande Talk’s About Jui Gadkari : जुई गडकरी सध्या ‘ठरलं मग मग’मधील भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे. तिची प्रकृती बरी नसतानाही तिने सुट्टी न घेता मालिकेचं चित्रीकरण केलं, यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं. अशातच आता मालिकेतली तिची ऑनस्क्रीन मैत्रीण कुसुमने एका मुलाखतीमध्ये सेटवर जुईचा वावर कसा असतो याबद्दल सांगत तिची पोलखोल केली आहे.
जुई गडकरीने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये तिची एक वेगळी छबी असल्याचं पाहायला मिळतं. साधी, सोज्वळ अशी जुईची प्रेक्षकांमध्ये ओळख आहे. अशातच आता अभिनेत्रीच्या मैत्रिणीने म्हणजेच ‘ठरलं तर मग’मध्ये कुसुमची भूमिका साकारणाऱ्या दिशा दानडेने सेटवर जुईचा वावर कसा असतो याबद्दल सांगितलं आहे.
जुई व कुसुम यांनी ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सेटवरील गमती जमती सांगितल्या आहेत. यादरम्यानच कुसुमने जुईबद्दल सांगितलं आहे. कुसुम गमतीने म्हणाली, “जुई गुंडी आहे, तुम्हाला माहीत नाहीये. मी आता फार याबद्दल सांगत नाही, पण मालिकेत मी जरी कुसुमताई असले तरी खऱ्या आयुष्यात ती माझ्यापेक्षा मोठी आहे. पण, ती मला ताई म्हणू देत नाही.”
जुईबद्दल बोलताना कुसुम पुढे म्हणाली, “जुई नाजूक दिसते पण ती तशी नाहीये. तिने तिची प्रकृती बरी नसतानाही खूप खंबीरपणे काम केलं.” यासह जुई पुढे कुसुमबद्दल म्हणाली, “ही माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, त्यामुळे मी म्हणेन ते हिला ऐकावं लागतं.”
कुसुम पुढे जुईबद्दल म्हणाली, “कोर्ट केसच्या सीनसाठी मी आले तेव्हा जुई आजारी असल्याने ती तेव्हा सेटवर नव्हती, पण ती नसताना मला खूप कंटाळा आला. सीन करताना आम्ही खूप मज्जा करत असतो. पण, त्यादिवशी ती नव्हती आणि नेहमी सीनच्यामध्ये आम्ही काही न काही करत असतो, त्यामुळे त्या दिवशी बोलण्यासाठी माझ्याकडे कोणीच नव्हतं.”
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. सध्या मालिकेत कोर्ट ड्रामा हा महत्त्वाचा भाग सुरू असलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे ही मालिका आता विशेष चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा असल्याचे पाहायला मिळतं. एकूणच मालिकेतील कोर्ट ड्रामामध्ये काय निकाल लागणार, पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.