Kamali fame Yogini Chouk praises onscreen daughter Vijaya Babar: चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांमध्ये आपसूकच मैत्री होताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांमधील बॉण्डिंग पाहायला मिळते.

कमळी‘ ही मालिका काही दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिकेत दिसत आहे. कमळी ही भूमिका तिने साकारली आहे. कमळी व तिची आई यांचे नाते, त्यांच्यातील प्रेम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

अभिनेत्री काय म्हणाली?

आता कमळीच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री योगिनी चौक दिसत आहेत. योगिनीने सोशल मीडियावर विजयाबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने मनातील भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. योगिनीने लिहिले, “तसं तर अगदी महिनाभरापूर्वीची भेट आपली; पण मैत्रीत कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही. तू माझी आणि मी तुझी भेट होण्याची वाट कधीपासून पाहू लागलो ते समजलंच नाही.”

पुढे अभिनेत्रीने लिहिले, “काल तो दिवस उजाडला जेव्हा इतक्या दिवसांनी आपण एकमेकींना कडकडून भेटलो. भेटीतील ती ओढ, ती ऊब खास होती. डोळ्यांच्या कडा ओलावल्या, भावना दाटून आल्या, खूप बोलायचं होतं; पण काय बोलावं हेच कळत नव्हतं. आपल्यामधून नुसतं प्रेम आणि माया ओसंडून वाहत होती.

“खऱ्या मायलेकी एकमेकींना इतक्या दिवसांनी जशा भेटाव्या, तसंच वाटत होतं. तुझे किती लाड करू, तुला किती जवळ घेऊ आणि किती पाहू, असंच झालं होतं. आईची माया आणि लेकीचा लळा होता. तू मला सतत ताई ताई म्हणून बोलावतेस, ते मला खूप आवडतं. माझ्या हातांनी बनवलेला रवा डोसा तू काल चाटून-पुसून खाल्लास, डबा खाऊन स्वच्छ केलास, तेव्हा मी भरून पावले. तुला घरचं मनसोक्त खाताना पाहून मला खूप बरं वाटलं.”

तुझ्या कामाचं कौतुक तर आहेच; पण त्याहीपेक्षा तुझी समज आणि समजूतदारपणा भावतो. तू खूप गोड आहेस आणि अशीच राहा. लव्ह यू. खूप मोठी हो, तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत अशा तुला शुभेच्छा आणि हो, पुन्हा लवकरच भेटू, असे लिहीत योगिनीने विजयाचे कौतुक केले.

या पोस्टवर विजयाने ताई, लव्ह यू, अशी कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. “अप्रतिम लिहिलं आहे”, “मायलेकींच गोड नातं”, “काही भेटी या नशिबात लिहिलेल्या असतात. तुमचं नातं, तुमचं प्रेम, आपुलकी आणि भेटीतली ती खास जाणीव अगदी शब्दांत उतरली आहे. किती छान! अशी माणसं आणि नाती कलाकारांच्या प्रवासात अमूल्य ठरतात. तुमचं हे नातं असंच अजून घट्ट होत जावो. खूप शुभेच्छा आणि दोघींनाही प्रेम”, अशा अनेकविध कमेंट्स दिसत आहेत.

मालिकेबद्दल बोलायचे, तर कमळी तिच्या आईचा विरोध पत्करून मुंबईत उच्च शिक्षणासाठी गेली आहे. मुंबईत तिला अनिका सतत त्रास देताना दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.