सध्या ‘झी मराठी’ वाहिनी एकापेक्षा एक वेगळं कथानक असलेले कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकताच ‘चला भावा सिटीत’ हा शो वाहिनीवर सुरू झाला. प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची बरीच चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. असं असतानाच वाहिनीनं अजून एक नवीन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणजेच ‘झी मराठी’ प्रसिद्ध मालिका ‘देवमाणूसचा’ नवीन अध्याय सुरू करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच वाहिनीनं सोशल मीडियावर पोस्ट करीत ही मालिका पुन्हा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु यावेळी ‘देवमाणूस’मध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाडच असणार का की कुठला नवीन चेहरा पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे पाहायला मिळाले. ‘झी मराठी’नंही याबाबत अद्याप कोणताच खुलासा केला नव्हता. अशातच आता नुकतच वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

समोर आलेल्या प्रोमोला फक्त ” ‘सुई’ बदलली आहे, ‘देवमाणूस’ तोच आहे”, अशी हटके कॅप्शन दिली आहे. तर प्रोमोमध्ये मालिकेच्या आधीच्या भागांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळालेल्या अभिनेत्री रुक्मिणी सुतार म्हणजेच सरूआजी मालिकेची गोष्ट सांगताना दिसत आहेत. याचसह अजून एक महत्त्वाचा कलाकार त्यामध्ये पाहायला मिळत आहे. तो म्हणजेच ‘देवमाणूस’च्या भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे. तर यावेळी किरण डॉक्टरच्या नाही, तर टेलरच्या वेशात पाहायला मिळत आहे.

वाहिनीनं पोस्ट केलेल्या प्रोमोखाली अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या किरण गायकवाडची पत्नी व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिनं ‘माप घेण्यासाठी “… all the best Devmanus”, अशी कमेंट करीत किरणला मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता शशांक केतकर, शरयू सोनावणे, यांनीही कमेंट करीत किरणचं अभिनंदन केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रोमोखाली अभिनेत्री अस्मिता देशमुखने ‘ब्युटिफुल’ अशी कमेंट केली आहे. अस्मिता यापूर्वी ‘देवमाणूस’च्या पहिल्या व दुसऱ्या भागात सागरिका पाटील ऊर्फ डिंपल या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली असून, या भागातही ती असेल का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२० साली ही मालिका सुरू झाली होती. पहिल्या भागाला भरभरुन प्रतिसाद मिळाल्याने वाहिनीने मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित सुरु झाला. अशातच आता या मालिकेचा ३ भाग लवकरच सुरु होणार आहे. तर यावेळी मालिकेत किरण गायकवाडसह कोणते नवीन चेहरे पाहायला मिळणार, पूर्वीच्या पात्रांची गोष्ट पुढे कशी गेली असेल?, ते कोणत्या नवीन रूपात पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran gaikwad returns in devmanus new serial to start on zee marathi watch the promo ads 02