Harshada Khanvilkar on Akshar Kothari: अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी ‘पुढचं पाऊल’मध्ये आक्कासाहेब, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सौंदर्या व ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लक्ष्मी या भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

चाहत्यांबरोबरच त्या कलाकारांमध्येदेखील लोकप्रिय आहेत. अनेक कलाकार त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलत असल्याचे पाहायला मिळते. अनेक जण त्यांना प्रेमाने मम्मा, असेही म्हणतात.

नुकतीच हर्षदा खानविलकर यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की तू अनेकांची लाडकी मम्मा आहेस, तर कोणाच्या लग्नात भावूक झाली होतीस?

हर्षदा खानविलकर अक्षर कोठारीबद्दल काय म्हणाल्या?

हर्षदा खानविलकर या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाल्या, “अक्षर कोठारीला मी सीनियर म्हणते. त्याचं नुकतंच लग्न झालं. त्याच्या लग्नाचा फोटो बघून मी भावूक झाले होते. कारण- तो लग्न करतोय की नाही, कोणाशी करतोय हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्याचं लग्न हे माझ्यासाठी सरप्राइज होतं. तो खूप चांगला मुलगा आहे. नकळत एखाद्याबद्दल छान वाटून डोळे पाणावतात, तसे त्याच्या लग्नाचा फोटो बघून झालं होतं.”

पुढे हर्षदा खानविलकर यांनी त्या अक्षरला सीनियर का म्हणतात, याचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, “तो सीनियर आहे. कारण- आम्ही दोघांनी एका वाहिनीवर खूप आणि सातत्यानं काम केलं आहे. त्यानं माझ्याआधी त्या वाहिनीवर काम करायला सुरुवात केली, म्हणून मी त्याला सीनियर म्हणते.”

हर्षदा खानविलकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत काम करीत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. मध्यमवर्गीय कुटुंबातील, घरातील माणसांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारी, चुकलेल्यांना शिक्षा करणारी आणि इतरांना मायेनं जवळ करणारी लक्ष्मी चाहत्यांच्या मनात भुरळ घालताना दिसते. मुलींची लग्नं थाटामाटात करायची आणि स्वत:चं घर बांधायचं हे लक्ष्मी व तिचा नवरा श्रीनिवासचं हे स्वप्न आहे. अनेकदा लक्ष्मीला संकटांना सामोरे जावे लागते. पण, धैर्याने सगळ्या संकटांचा सामना करताना दिसते.

अक्षर कोठारीच्या कामाबद्दल बोलायचं, तर तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेत अद्वैत चांदेकर ही भूमिका साकारताना दिसत आहे. कला व अद्वैत चांदेकर यांच्यामधील छोटी-मोठी भांडणं प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसतं.