Meghan Jadhav And Anushka Pimputkar Relationship: ‘लक्ष्मी निवास’मधील जयंत हा घराघरात पोहोचला आहे. जान्हवीवर असलेले त्याचे अतिप्रेम, विचित्र आणि विकृत वागणे, यामुळे जयंत या पात्राची मोठी चर्चा झाली. जान्हवी इतर कोणाबरोबर बोलली, त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर जयंत तिला विचित्र शिक्षा देत असल्याचे तसेच संबंधित व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत ही भूमिका अभिनेता मेघन जाधवने साकारली आहे. मेघन जाधव हा आता त्याच्या भूमिकेमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्याचे कारण त्याने शेअर केलेला फोटो ठरत आहे.
मेघन जाधवने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातात एका मुलीचा हात दिसत आहे. दोघांच्या बोटांमध्ये अंगठी दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने हार्ट इमोजी शेअर केली आहे. तसेच ‘तुम हो तो…’ हे गाणे लावले आहे.
दुसरीकडे, मेघनची मैत्रीण अनुष्का पिंपुटकरनेदेखील एक फोटो शेअर केला आहे. तिनेदेखील ‘तुम हो तो…’ हे गाणे लावले आहे. तसेच मेघनप्रमाणेच हार्ट इमोजी शेअर केली आहे.
अनुष्काने शेअर केली पोस्ट
याबरोबरच अनुष्काने मेघनबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विविध ठिकाणं, विविध आठवणी असलेले फोटो तिने शेअर करत हार्ट इमोजी शेअर केली आहे. तसेच फोटो शेअर करताना हार्ट इमोजी शेअर केली आहे, तसेच मेघनलादेखील टॅग केले आहे.
हे फोटो शेअर करत मेघन व अनुष्काने प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच बोटातील अंगठ्या पाहून त्यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चादेखील रंगत आहेत. आता मेघन व अनुष्काने शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर इतर कलाकार कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. दिव्या पुगावकर, आशुतोष गोखले, विदिशा म्हसकर यांनी या फोटोंवर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर चाहत्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.
चाहते म्हणाले…
“अखेर तुम्ही सर्वांना सांगितलं, मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे”, “तुम्ही दोघे किती गोड दिसता”, “क्यूट”, “अभिनंदन”, “तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
मेघन आणि अनुष्का यांनी काही दिवसांपूर्वी एकत्र मिळून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘Marry & Adore’ असे त्यांच्या व्यवसायाचे नाव आहे. अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ ती शेअर करते.
