Swati Deval shares experience of working with Ram Kapoor: अभिनेत्री स्वाती देवल ही तिच्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. तिने मराठीसह हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे. तिच्या काही मराठी भूमिकांना मोठी लोकप्रियता मिळाली.

सध्या अभिनेत्री ‘लक्ष्मी निवास‘ या मालिकेत मंगल ही भूमिका साकारताना दिसत आहे. आई-वडिलांना त्रास देणारी, स्वार्थी अशी मंगल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फायदा व्हावा, यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसते. माहेरकडून ती मोठ्या अपेक्षा करताना दिसते. स्वाती देवलने ज्या पद्धतीने ही भूमिका साकारली आहे, त्याचे प्रेक्षक कौतुक करताना दिसतात.

स्वाती देवल काय म्हणाली?

आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत राम कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. स्वातीने काही दिवसांपूर्वी ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी एका वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली. मी जेव्हा तिथे गेले, तेव्हा मला माहीत नव्हतं की, मेन लीड भूमिका कोण साकारत आहे. कोण प्रमुख भूमिका करणार आहे, असा प्रश्न मला पडला होता. तिथे राम कपूर दिसल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. कारण- मी लहान असताना राम कपूर आणि त्यांची बायको गौतमी यांची एक मालिका होती, ती मी पाहिली होती. तेव्हा ते चॉकलेट बॉय होते.

“मला भीती वाटत होती. इतकी वर्षं काम करत असूनही जेव्हा तुम्ही वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करता, तेव्हा भीती वाटते. ती भूमिकादेखील वेगळी होती. मी मानसिक स्थिती ठीक नसलेली अशी ती भूमिका होती. माझ्या करिअरमधील ती वेगळी भूमिका वेगळी आहे. तर ते जेव्हा बोलतील, तेव्हा मला त्यांच्या अंगावर धावून जायचं होतं.

“सीन शूटिंग करण्याअगोदर ते माझ्याशी बोलायला आले. त्यांचा तो मोठेपणा होता. ती व्यक्ती माझ्याशी स्वत:हून बोलायला आली, हे त्यांचं वागणं मला आवडलं. ते मला म्हणाले की, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. आपण याआधी एकत्र काम केलं आहे का? तर मी त्यांना म्हणाले की नाही. पण, तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही हिंदीमध्ये काही काम केले आहे का? मी म्हणाले की हो. मग त्यांना सांगितलं. त्यांनी शेखर सुमन यांची ती मालिका पाहिली होती. मग त्यांना आठवलं की त्यांनी मला त्या मालिकेत पाहिलं होतं.

“तो सीन मी मोठ्या आवाजात केला होता. त्या सीनमध्ये मी त्यांना धक्का मारून निघून जाते, असा तो सीन होता. सीन संपल्यानंतर मी परत चालत येत होते. तेव्हा मला प्रचंड टाळ्यांचा कटकडाट ऐकू आला. राम कपूर यांनी मला विचारलं की, तुम्ही नाटकात काम केलं आहे? मी म्हटलं हो. तर त्यावर ते म्हणाले की, मी खरंच घाबरलो. मला तुमच्याबरोबर काम करून छान वाटलं. त्यानंतर आमचे जे दोन-तीन सीन झाले, त्यावेळी ते सेटवर आले की, ते स्वत: येऊन बोलायचे”, अशी आठवण स्वातीने सांगितली.

दरम्यान, स्वाती देवल सध्या ‘मनपसंद की शादी’ या मालिकेतदेखील काम करताना दिसत आहे.